विनामास्क भ्रमंती २६५ जणांना पडली महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:41 IST2020-12-05T04:41:00+5:302020-12-05T04:41:00+5:30
माळशिरस : कोरोना महामारी सुरू असतानाच बँका, आठवडा बाजार, कार्यालये व सण समारंभानिमित्त अनेक ठिकाणी गर्दी आढळून येत आहे. ...

विनामास्क भ्रमंती २६५ जणांना पडली महागात
माळशिरस : कोरोना महामारी सुरू असतानाच बँका, आठवडा बाजार, कार्यालये व सण समारंभानिमित्त अनेक ठिकाणी गर्दी आढळून येत आहे. यामध्ये मास्क, फिजिकल डिस्टन्स, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आदी गोष्टींबाबत नागरिक बेफिकीरपणे भ्रमंती करताना दिसत होते. याच अनुषंगाने माळशिरस पोलिसांनी दंडात्मक कारवाईचे पाऊल उचलत २६५ जणांकडून महिन्याभरात एक लाख ३२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला.
गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाचा वेग मंदावला होता. मात्र दिवाळी सण व विविध कार्यक्रमांमध्ये वाढत्या गर्दीत विनामास्क वापरण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे पुन्हा कोरोनाचा आलेख वाढताना दिसत आहे. यासाठी सुरक्षा बाळगणे महत्त्वाचे ठरत आहे. यासाठी सुरक्षासंदर्भातील उपाययोजना करताना दंडात्मक कारवाईचा बडगा पोलिसांनी उगारल्याचे दिसत आहे.
कोट :::::::::::::
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल.
- विश्वंभर गोल्डे, पोलीस निरीक्षक, माळशिरस
---
पिचकारी मारणाऱ्या पिचकूंना दणका
विनामास्क फिरणाऱ्या २६५ जणांवर कारवाई करत एक लाख ३२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल झाला. फिजिकल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्या २६ जणांना २६०० रुपये दंड भरावा लागला, तर सार्वजनिक ठिकाणी पिचकाऱ्या मारणाऱ्या १२ जणांना २४०० रुपये दंड भरावा लागला.
फोटो लाइन
०२पंड०३
विनामास्क रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करताना माळशिरसचे पोलीस कर्मचारी.