विद्यापीठ ग्रंथालय झाले ‘वाय-फाय’
By Admin | Updated: August 1, 2014 23:28 IST2014-08-01T23:16:26+5:302014-08-01T23:28:10+5:30
अंध विद्यार्थ्यांसाठी ‘स्टडी सेंटर’ही खुले

विद्यापीठ ग्रंथालय झाले ‘वाय-फाय’
कोल्हापूर : बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयामध्ये आज, शुक्रवारी वाय-फाय सेवेचे तसेच अंध वाचकांसाठी स्टडी सेंटरचे उद्घाटन कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या हस्ते झाले. बॅ. खर्डेकर जन्मशताब्दीचे औचित्य साधून ग्रंथालयातील अभ्यासिका व ग्रंथालयासमोरील आवारामध्ये आज प्रायोगिक तत्त्वावर वाय-फाय सेवा सुरू करण्यात आली. अंध वाचकांसाठी उपयुक्त अशा स्टडी सेंटरचे उद्घाटनही कुलगुरू डॉ. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. इंटरनेटसह ग्रंथालयातील अन्य सुविधांचा लाभही अंध विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. आवश्यक त्या प्रिंट घेऊन वाचता येण्यासाठी विशिष्ट ब्रेल प्रिंटरही येथे बसविला आहे. विद्यापीठ अधिविभागांतील शिक्षकांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन ग्रंथालयात भरविण्यात आले. त्याचेही उद्घाटन कुलगुरूंच्या हस्ते झाले. प्रदर्शनात ९० पुस्तके मांडण्यात आली होती. कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, ग्रंथपाल डॉ. नमिता खोत, डॉ. पी. एन. भोसले, डॉ. आर. के. कामत, डॉ. मिलिंद जोशी, पी. व्ही. बिलावर, डी. बी. सुतार, कल्याण देवरूखकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अशी राहणार ‘वाय-फाय’ सुविधा
अभ्यासिकेसह ग्रंथालय आवारातील साधारण २०० फूट अंतरापर्यंत विद्यार्थ्यांना या वाय-फाय सेवेचा लाभ घेता येईल. सध्या प्रायोगिक तत्त्वावर ती सुरू करण्यात केली आहे. तिच्या चाचण्या घेण्याचे काम सुरू आहे. कालांतराने ती विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात येईल. त्यासाठी विद्यार्थ्यांनी विभागप्रमुखांमार्फत इंटरनेट युनिटशी संपर्क साधून विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक असणार आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर दोन दिवसांत त्यांना अॅक्सेस मिळू शकेल. सध्या इंटरनेट हॉलमध्ये शंभर तास वापराचे कार्ड विद्यार्थ्यांना देण्यात येते. ते वाय-फाय पद्धतीने वापरावयाचे झाल्यास दर मंगळवारी ते इंटरनेट कक्षाकडे नोंदणीसाठी द्यावे लागणार आहे.