खासगी संघाच्या एकजुटीने गाईच्या दुधाचा खरेदी दर केला कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 14:19 IST2020-10-26T14:19:21+5:302020-10-26T14:19:25+5:30
२१ आॅक्टोबरपासून २२ रुपये दर; दूध उत्पादक शेतकºयांची आर्थिक अडचण कायम

खासगी संघाच्या एकजुटीने गाईच्या दुधाचा खरेदी दर केला कमी
सोलापूर : खासगी दूध संघ एकत्रित येत गाईच्या दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर २२ रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दूध उत्पादकांना पुन्हा आर्थिक अडचणीचा काळ सुरू झाला आहे.
सातत्याने दूध दरात घसरण होत असल्याने शेतकरी पूर्णत: आर्थिक अडचणीत आहे. त्यातच कोरोनाच्या संकटामुळे तर दूध उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. कोरोना सुरू झाल्यानंतर दूध खरेदी दरात मोठी घसरण झाली. गाईच्या दुधाचा खरेदी दर १७-१८ रुपयांवर आला होता. शेतकरी संघटना व शेतकºयांनी उठाव केल्यानंतर सहकारी दूध संघाचे दूध खरेदी करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. काही मोजक्याच सहकारी संघाचे दूध शासन महानंदमार्फत खरेदी करीत आहे. मधला एक -दीड महिन्याच्या कालावधीत शासनाने दूध खरेदी बंद केली होती. आताही महानंदमार्फत काही मोजक्याच सहकारी दूध उत्पादक संघाचे दूध शासन खरेदी करीत आहे.
इकडे खासगी संघाचा जून- आॅगस्ट महिन्यात १७ रुपयांवर गेलेला दूध खरेदी दर सावरत २५ रुपये इतका झाला होता. खर्च अधिक अन् उत्पन्न कमी असतानाही पर्याय नसलेला शेतकरी प्रामाणिकपणे गाई सांभाळत दूध खरेदी दरात वाढ होण्याची वाट बघत होता.सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात दर सावरले असतानाच २१ आॅक्टोबरपासून प्रतिलिटर २२ रुपयाने दूध खरेदी करण्याचा निर्णय खासगी संघांनी घेतला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत येणार आहे.
----------
नियंत्रणाबाहेर गेला दूध व्यवसाय
- - खासगी संघाचे वर्चस्व असलेला दूध व्यवसाय सरकारच्या नियंत्रणाबाहेर गेला आहे. शासनाने २५ रुपयाने दूध खरेदी करण्याचा निर्णय घेतला तर सहकारी संघ २५ रुपयाने दूध खरेदी करतात तर खासगी संघ १७-१८ रुपये इतकाच दर देतात. आता कुठे दर वाढला असतानाच खासगी संघांनी एकत्रित येत दर २२ रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे.
- - एका प्रमुख खासगी दूध संघांच्या प्रमुखाने दराबाबत बोलताना भाजप सरकारने सर्वच दूध संघांच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान दिले होते. आता आघाडी सरकारमधील प्रमुख नेत्यांच्या संघाचे दूध २५ रुपयाने खरेदी करीत असल्याने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागल्याचे सांगितले.
- - राज्यात २४ टक्के दूध सहकारी तर ७६ टक्के दूध खासगी संघ खरेदी करतात असे एका खासगी संघाच्या प्रमुखांनी सांगितले.
----------
शेतीत कितीही कष्ट केले तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे कितीही खर्च केला तरी एकतर उत्पादन येत नाही किंवा उत्पादन आले तर भाव मिळत नाही.जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय केला तर तोही परवडत नाही. सरकार ठोस धोरण घेत नाही.
- संजय देशमुख
दूध उत्पादक शेतकरी