जिद्दी तरुणाचा अनोखा संघर्ष; लाॅकडाऊनमध्ये ड्रायव्हर गावाकडे आला अन्‌ गावकारभारी झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 01:14 PM2021-01-30T13:14:46+5:302021-01-30T13:14:52+5:30

बाळेेवाडीच्या जिद्दी तरुणाचा अनोखा संघर्ष

The unique struggle of a stubborn youth; In the lockdown, the driver came to the village and became the village headman | जिद्दी तरुणाचा अनोखा संघर्ष; लाॅकडाऊनमध्ये ड्रायव्हर गावाकडे आला अन्‌ गावकारभारी झाला

जिद्दी तरुणाचा अनोखा संघर्ष; लाॅकडाऊनमध्ये ड्रायव्हर गावाकडे आला अन्‌ गावकारभारी झाला

Next

नासीर कबीर

करमाळा : लॉकडाऊनने साऱ्यांचे जनजीवन विस्कळीत केले... अनेकांची रोजीरोटी बंद झाली. बाळेवाडीच्या नितीन लोंढेचेही अगदी तसेच काहीसे. पुण्यात ड्रायव्हर म्हणून कामाला. गावात मिळेल ते काम करून लोकांचा विश्वास संपादन केला. काहीवेळा संघर्षही झाला. तशातच निवडणूक आली. त्यात तो जिंकलाही अन्‌ आरक्षणात त्याला चक्क सरपंचपद अर्थात ‘गावकारभारी’ म्हणून सेवा करण्याची संधी चालून आली आहे.

 खरे तर लॉकडाऊनमध्ये नितीन हनुमंत लोंढे नावाचा युवक पुण्याहून बाळेवाडीला आला... पुण्यात एक ड्रायव्हर म्हणून काम करत होता. गावात राहू लागला. चांगल्या स्वभावामुळे आणि गोड बोलण्यामुळे तो सर्वांत मिसळून गेला आणि नितीन गावाचा मित्र झाला. मिळेल ते काम करू लागला. शेतात उडीद, तुरी पेरल्या... चांगले उत्पादन मिळाले.

त्याला मंजूर झालेले रमाई घरकुल, घर बांधण्यासाठी जागा नसल्यामुळे जुने घर पाडले; पण त्याच्या घरकुलाला तांत्रिक अडचण काढून मागच्या कारभारी लोकांनी अडवणूक केली. तरी त्याने जिद्द सोडली नाही. 

अशातच गावात निवडणूक लागली. दलित वस्तीने एकमुखाने नितीनच्या नावाची शिफारस केली. बाकी गावानेही सूचना मान्य केली. गावातून त्याच्याविरोधात कुणी अर्ज भरायला पुढे आले नाही. मग पुण्यातून एका त्याच्या भावकीतल्या माणसाला पटवून विरोधकांनी उभे केले. तरीही गडी मागे हटला नाही. तो प्रचार करत होता. गाठीभेटी घेत राहिला. जवळ पैसा नव्हता, कारण लॉकडाऊनमुळे तो गावी आला होता. प्रतिस्पर्धी पॅनलने पुण्याहून येणाऱ्या मतदारांना अनेक प्रलोभने दाखवली; पण सुग्रीव नलवडे आणि हर्षवर्धन नलवडे यांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्याच्या स्वभावामुळे लोकांनी प्रतिस्पर्धी लोकांचे पैसे घेऊनही नितीन लोंढेलाच विजयी केले. सुदैवाने आरक्षण पडले आणि तो सरपंच झाला. आता तो गावकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज झालाय. 

लोकांसाठी झटतोय अन्‌ झटणार
हा माणूस कोणाची अडचण झाली तरी तो लोकांची अडवणूक करणारा नाही. तो शिकलेला आहे. त्याने जग पाहिलेय, त्याने विकास पाहिलाय. तो सगळ्यांना सोबत घेऊन गाव पुढे नेईल. तो गावाच्या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर झालाय. लोकशाहीच्या उत्सवात नितीन लोंढे सामील झाला. लोकांसाठी तो झटतोय, तो गावातल्या शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवणार यात शंका नाही, असा विश्वास लोकांमधून व्यक्त होऊ लागला आहे. 

 

Web Title: The unique struggle of a stubborn youth; In the lockdown, the driver came to the village and became the village headman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.