सोलापूर विभागात दोनशे टपाल पेट्या कर्यरत
By दिपक दुपारगुडे | Updated: April 12, 2023 17:30 IST2023-04-12T17:26:18+5:302023-04-12T17:30:43+5:30
सोलापूर टपाल विभागात अद्याप २०० टपाल पेट्या कार्यरत असून खेड्यांपासून शहरांपर्यंत असलेली गर्दी टपाल कार्यालयांमध्ये दिसत आहे.

सोलापूर विभागात दोनशे टपाल पेट्या कर्यरत
सोलापूर : सध्याच्या डिजिटल युगात एका खात्यातून दुसऱ्या खात्यात निधी स्थानांतरण काही सेकंदात होते; परंतु या काळातही टपाल खात्याच्या पारंपरिक ‘टपाल पेट्या’चे महत्त्व मात्र अद्याप कायम आहे. सध्याचे संगणकाचे युग आहे. एकमेकांच्या संवादासाठी आता मोबाइलची क्रांती झाली असून आधुनिक संदेशवहनासाठी पूर्वीच्या पत्राची जागा आता ई-मेल व मॅसेजने घेतली आहे. सोलापूर टपाल विभागात अद्याप २०० टपाल पेट्या कार्यरत असून खेड्यांपासून शहरांपर्यंत असलेली गर्दी टपाल कार्यालयांमध्ये दिसत आहे.
पूर्वी लहानपणी नातेवाइकांचे आलेले पत्र वाचण्यात मोठी मजा होती. तसेच लग्नपत्रिका, दु:खद बातमी, आनंद वार्ता असे सगळे काही चालायचे ते टपालपेटीमार्फत... जवानांपासून ते कंदिलाच्या प्रकाशात आपल्या मुलाच्या उत्तराची वाट पाहत बसलेली एखादी म्हातारी आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना त्या पोस्टातल्या पत्राचा ध्यास लागलेला असायचा. परंतु आता व्हॉट्सॲप, ई-मेल, फेसबुक या माध्यमांद्वारे काही क्षणातच सुखदु:खाचा निरोप संबंधित नातेवाइकापर्यंत पोहोचत असल्याने आता टपालपेटीचे काम कमी झाले असले तरी ते आपले अस्तित्व टिकवून आहेत.
म्हणून आहेत कार्यरत
सध्या पोस्टामधून शासनाने 'संजय गांधी', 'श्रावणबाळ' अशा विविध योजना निराधारांना सुरू करून त्यांचा दर महिन्याचा पगार हा पोस्टामधूनच केला जातो. सरकारी कार्यालयांचा व्यवहार, बँका, खासगी संस्थांचा पत्रव्यवहार, कोर्टाचा पत्रव्यवहार पोस्टाच्या माध्यमातून सुरू असल्यामुळे पोस्टाच्या पेट्या कार्यरत आहेत.
काय म्हणतात टपाल अधिकारी
अनेकांना टपाल पेट्यांचा पर्याय कालबाह्य वाटत असला तरी त्याची उपयोगिता मात्र संपली नाही. कारण आजही दुर्गम भागात पत्र पोहोचवणारा पोस्टमन सरकारी योजनांचा लाभही लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहे.