‘कोल्हापूर बंद’चा प्रयत्न
By Admin | Updated: August 2, 2014 00:01 IST2014-08-01T23:41:00+5:302014-08-02T00:01:01+5:30
पोलिसांची कडक भूमिका : राजेश क्षीरसागर यांच्यासह २७ जण ताब्यात

‘कोल्हापूर बंद’चा प्रयत्न
कोल्हापूर : शिवसेना नेते आमदार दिवाकर रावते यांना येळ्ळूर येथे येण्यास मज्जाव केला. या घटनेच्या निषेथार्थ आज, शुक्रवारी कोल्हापुरात शिवसेनेच्यावतीने कोल्हापूर ‘बंद’चे आवाहन केले. दुचाकीवरून आवाहन करत जाणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने ‘बंद’चा प्रयत्न अयशस्वी झाला. याप्रकरणी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह २७ हून अधिक कार्यकर्त्यांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताब्यात घेऊन सुटका केली.
रावते यांना रोखल्याचे वृत्त समजताच शहरातील शिवसैनिक आमदार क्षीरसागर यांच्या शनिवार पेठ येथील निवासस्थानी एकत्र जमले. येथून आमदार क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली दुचाकीवरून कोल्हापूर ‘बंद’चे आवाहन करीत कार्यकर्ते महाद्वार रोड मार्गे पापाची तिकटी येथे येत होते. हा प्रकार समजताच पोलिसांनी आमदार क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांना लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात आणले. यावेळी शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी कोल्हापूर बंद करू नका, असे आमदार क्षीरसागर यांना सांगितले. क्षीरसागर यांनी कोल्हापूर बंद न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर या सर्वांवर कारवाई करून पोलिसांनी सोडून दिले.
पोलीस अधीक्षकांची सतर्कता
मागील वर्षी शिवसेनेने बेळगावच्या मुद्द्यावर कोल्हापूर बंदची हाक दिली होती. यावेळी शहरात मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली होती. यामुळे पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी तातडीने शिवसैनिक जमा होऊन काही घडण्याच्या अगोदरच त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील ‘राडा’ टळला.
सरकारी ‘चहापान’
ताब्यात घेतलेल्या शिवसैनिकांचा पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे व पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर जबाब घेण्याचे काम सुरू होते. यावेळी नावनोंदणी करेपर्यंत चहा मागविण्यात आला. या चहाचा आमदारांसह सर्व कार्यकर्त्यांनी आस्वाद घेतला. इतरवेळी कडक भूमिका वटविणाऱ्या पोलिसांच्या हातात चहाचा ट्रे बघून उपस्थितांना थोडे आश्चर्यच वाटले. पोलिसांच्या या ‘सरकारी चहापाना’ने कार्यकर्ते चांगलेच सुखावले.
नागरिकांचा उडाला गोंधळ !
अचानक शिवसेनेचे कार्यकर्ते दुकान बंद करण्याचे आवाहन करू लागल्याने व्यापाऱ्यांसह नागरिक गोंधळून गेले. नेमके काय झाले याची विचारपूस नागरिक पोलिसांसह प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडे करत होते.
अटक केलेले शिवसैनिक आमदार राजेश क्षीरसागर, शहरप्रमुख शिवाजी जाधव व दुर्गेश लिंग्रस, ऋतुराज क्षीरसागर, जयवंत हारूगले, गजानन भुर्के , राजू पाटील, विक्रम पोवार, अजिंक्य गायकवाड, राजू जाधव, अमित चव्हाण, सुधीर काशीद, सुनील भोसले, दीपक चव्हाण, बाळासाहेब पांडव, सागर मूलधरणी, सुजित देशपांडे, रमेश खाडे, धर्माजी सायनेकर, अर्जुन संकपाळ, नीलेश जाधव, सुनील जाधव, ओंकार परमणे, चेतन शिंदे, राजू जाधव, रमेश पोवार, केतन राऊत, आदींना लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले.