तिरंगी लढत, विकासकामे, अनुभवामुळे सोपल विजयी
By Admin | Updated: October 21, 2014 13:53 IST2014-10-21T13:53:35+5:302014-10-21T13:53:35+5:30
दिलीप सोपल यांनी केलेली विकासकामे, भाजपची उमेदवारी, त्यामुळे शिवसेनेला मानणार्या मतांचे झालेले विभाजन तसेच निवडणुकीतील सर्व तंत्रांचा केलेला अवलंब याचा फायदा झाला.

तिरंगी लढत, विकासकामे, अनुभवामुळे सोपल विजयी
शहाजी फुरडे-पाटील■ बाश्री
मंत्रिपदाच्या काळात दिलीप सोपल यांनी केलेली विकासकामे तसेच महायुतीचे गणित बिघडल्याने मतदारसंघात आलेली भाजपची उमेदवारी, त्यामुळे शिवसेनेला मानणार्या मतांचे झालेले विभाजन तसेच निवडणुकीतील सर्व तंत्रांचा केलेला अवलंब याचा फायदा झाला. अनुभवाच्या जोरावर राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप सोपल हे सहाव्यांदा विधानसभेत जाण्यात यशस्वी झाल्याचे निकालावरून दिसून येते.
सेना-भाजपबरोबर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीही स्वतंत्र लढली असली तरी काँग्रेसचे सुधीर गाढवे यांना जादा मते न मिळाल्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा कोणाच्याच विजयात व पराजयात हातभार लागला नाही. भाजपचे राजेंद्र मिरगणे यांना मागील वेळेचे सेनेचे उमेदवार विश्वास बारबोले यांच्याएवढीही मते मिळवता आली नाहीत. त्यांना केवळ १६,५0६ मते मिळाली तर काँग्रेसचे सुधीर गाढवे यांना अवघी १६५४ मते मिळाली आहेत. तिरंगी किंवा बहुरंगी लढत झाल्यास सोपल हे निवडून येतात, अशी मतदारांची खात्री होती व मतदारसंघात देखील तशी चर्चा होती. त्याप्रमाणे भाजपच्या साथीने झालेल्या तिरंगी लढतीत शिवसेनेचे राऊत यांचा बळी गेला व सोपल यांचा विजय सुकर झाला.
सोपल विरोधात माजी आ. तथा शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी कडवी झुंज दिली. त्यांचे कार्यकर्ते देखील जिवाचे रान करून ईर्षेने पळाले, परंतु त्यांना निम्म्या वैराग भागाने मताधिक्य दिले. मात्र निम्म्या भागाने सोपल यांना साथ दिली. उत्तर बाश्रीतील पांगरी जि. प. गटाने सोपल यांना अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे २६४७ चे मताधिक्य दिल्याने ग्रामीण भागातील मताधिक्य ग्रामीण भागातच कमी झाले. बाश्री शहर हे आजवर सोपल यांच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलत आले आहे. नेहमीप्रमाणे यंदाही बाश्री शहराने सोपल यांना मागील वेळेपेक्षा जास्त म्हणजे ५१0४ मते जास्त दिली. त्यामुळे राऊत फारच मागे पडले. साम, दाम, दंड, भेद ही नीती राजकारणातील अस्त्रेही विजयाचा मार्ग मोकळा करून गेली.
सोपल यांच्या १९८५ ते १९९९ या काळात त्यांच्या विरोधात लढलेला विरोधक पुन्हा लढण्यात यशस्वी झाला नाही, मात्र राऊत हे १९९९ पासून प्रत्येक निवडणुकीत सोपल यांना झुंजत आहेत. सोपलांचे कट्टर विरोधक अशी प्रतिमा असल्याने सोपलविरोधी गट राऊत यांच्या पाठीमागे एकवटला. आजही तो कायम आहे. २00९ ला विश्वास बारबोले यांच्यामुळे मराठा मतात झालेले विभाजन सोपलांच्या फायद्याचे ठरले. यावेळीही मिरगणे यांच्या रूपाने मराठा उमेदवारच तिरंगी लढतीत आला. त्यात पुन्हा दोघांचे पक्ष हिंदुत्वाच्या विचारधारेचे असल्याने त्यांच्या मतात विभागणी झाली. धर्मनिरपेक्ष मतांचे ध्रुवीकरण झाले अन् तेही सोपल यांच्या पथ्यावर पडले.
याचबरोबर निवडणुकीतील प्रचाराचा मुद्दा असलेल्या बाश्री उपसा सिंचन योजनेच्या भागातील वांगरवाडी गावात केवळ सोपल यांना मताधिक्य मिळाले, उर्वरित गावे राऊतांच्या पाठीशी गेली. सोपल यांनी पाणीपुरवठा मंत्री म्हणून अनेक गावांना मंजूर केलेल्या पाणीपुरवठा योजना, ३0 वर्षांच्या कार्यकाळात केलेली विकासकामे, वैयक्तिक कामे, त्यांचे कर्तृत्व हे मुद्दे देखील विजय मिळवून देण्यात महत्त्वाचे ठरले आहेत.
राऊत यांनी निवडणुकीतील प्रचारात वैराग तालुका निर्मिती, वैराग व बाश्रीची एमआयडीसी, बाश्री उपसा सिंचन या मुद्यांना हात घातला. तसेच संतनाथचा विषयही ऐरणीवर आणला होता. त्यामुळे वैराग भागातून त्यांना मते मिळाली. विश्वास बारबोले, संतोष निंबाळकर यांच्यासह त्यांचे सर्व सहकारी देखील जिद्दीने पळाले व यामुळेच राऊत हे सोपल यांचे मताधिक्य कमी करू शकले. राऊत यांना वैराग भागातून मोठे मताधिक्य मिळेल असा अंदाज होता. मताधिक्य मिळाले मात्र ते विजयापर्यंत घेऊन जाऊ शकले नाही. पांगरीवरील त्यांचा अंदाजही चुकला, इथेच राऊतांचे विजयाचे गणित हुकले. ग्रामीण भागात सोपल यांना पांगरी जि. प. गटातून २६४८ तर गावामध्ये खामगावातून सर्वाधिक ५५६ मताधिक्य मिळाले. राऊत यांना श्रीपतपिंपरी जि. प. गटातून १५४७ तर गावामध्ये गुळपोळीत ७२६ मताधिक्य मिळाले. त्यामुळे युवराज काटे व इंद्रजित चिकणे यांचे गावावरील वर्चस्व दिसून येते. अपेक्षित मताधिक्य नाही ■ तरीही गतवेळच्या निवडणुकीतील मते व यावेळच्या निवडणुकीतील मते पाहता राऊत यांच्या मतात सोपल यांच्यापेक्षा वाढच झाल्याचे दिसून येते. सोपल यांचा विजय झाला असला तरी त्यांच्या मताधिक्यामध्ये काही प्रमाणात घट झाली आहे. लहान असो वा मोठा, विजय हा विजयच असतो. तरीही अपेक्षित मताधिक्य न मिळाल्याने त्यांना एक संदेश देणारा हा निकाल आहे.