व्यापाऱ्यांनी लॉबिंग करून गुळाचे दर पाडले

By Admin | Updated: November 19, 2014 23:36 IST2014-11-19T23:36:27+5:302014-11-19T23:36:27+5:30

निमित्त अवकाळी पावसाचे : शेतकऱ्यांना प्रति अडीच क्विंटलला २३४० रुपये तोटा

The traders threw the bucks by lobbying | व्यापाऱ्यांनी लॉबिंग करून गुळाचे दर पाडले

व्यापाऱ्यांनी लॉबिंग करून गुळाचे दर पाडले

प्रकाश पाटील - कोपार्डे -अवकाळी पावसाचे निमित्त पुढे करून व्यापाऱ्यांनी बाजार समितीत गुळाचा दर पाडण्याचा फंडा अवलंबला असून, आता शेतकऱ्यांच्या कमी प्रतीच्या गुळाला २६००, तर उच्च प्रतीच्या गुळाला ३२०० ते ३३०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. गुळाला मिळणारा प्रति क्विंटल दर व त्याचा उत्पादन खर्च याचा मेळ घालताना शेतकऱ्यांच्या तोंडाला फेस येत आहे.
एखाद्या शेतकऱ्यास दुसऱ्याच्या गुऱ्हाळात आपला ऊस गाळपासाठी द्यावयाचा झाल्यास गुऱ्हाळघरांचे एका रात्रीचे भाडे (चार आदणे) सध्या दहा हजार ते १२ हजारपर्यंत मोजावे लागतात. एवढेच नाही, तर यावर एक क्विंटल (१०० किलो) गूळही द्यावा लागतो. यानंतर तयार झालेला गूळ बाजार समितीमध्ये विक्रीसाठी पोहोचविण्यापासून तो विक्री होईपर्यंत प्रत्येक स्तरावर शेतकऱ्याची पिळवणूकच केली जाते. यात अडत कमिशन तीन टक्के, तोलाई, हमाली यांचा समावेश होतो.
एवढेच नाही तर बाजार समितीत हा गूळ गेल्यानंतर जो सौदा काढण्याची पद्धत आहे ती अजबच आहे. एकाच क्षेत्रातील गाळप केलेल्या उसाच्या गुळातून वेगवेगळी कलमे काढली जातात. एवढेच नव्हे तर आदणात तयार झालेल्या गुळाची प्रत व्यापाऱ्यांच्या मर्जीने ठरविली जाते. काहीवेळा ही प्रतदेखील व्यापारी नव्हे, तर हमाल ठरवितात. ही चीड आणणारी प्रथा वर्षानुवर्षे चालू आहे.
आजही व्यापाऱ्यांकडून बदली रवे काढण्याची प्रथा सुरू आहे. सौदे काढताना बाजार समितीत उतरलेल्या गुळाच्या थप्पीवरून पायातील चपलाही न काढता व्यापारी व हमालाकडून चालण्याचा प्रकार होतो. शेतकऱ्याने जिवापाड कष्ट करून पिकविलेल्या उसापासून तयार केलेल्या गुळाची चव ठरविण्याचा अधिकारच राहिलेला नाही. तो व्यापाऱ्यांकडूनच ठरविला जातो.
या साऱ्याप्रकाराबरोबरच अवकाळीचे कारण पुढे करून गुळाचे दर पाडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांनी कारखान्यांना ऊस देण्यास पसंती दिली आहे. यातून गुऱ्हाळघरांवर संक्रांत येणार असून, हा कुटिरोद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

Web Title: The traders threw the bucks by lobbying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.