वाद्यांच्या तालावर थिरकली तरुणाई
By Admin | Updated: August 4, 2014 01:14 IST2014-08-04T01:14:05+5:302014-08-04T01:14:05+5:30
अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणूक : अभिवादनासाठी एकवटला जनसमुदाय

वाद्यांच्या तालावर थिरकली तरुणाई
सोलापूर : ‘पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून, ती कामगारांच्या तळहातावर उभी आहे’ असा संदेश देत समाजातील वंचित, शोषित समाजाला आपल्या हक्काची जाणीव करून देणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त शहर परिसरातील विविध तरुण मंडळे, सामाजिक संस्थांच्या वतीने भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांसह डॉल्बीच्या आवाजावर तरुणाई थिरकताना दिसत होती.
शहरातील विविध मंडळांनी दुपारी ४ वा. मिरवणुकांना सुरुवात केली. राहुल गांधी झोपडपट्टी येथील जय मातंग तरुण मंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत डॉल्बी लावण्यात आला होता. अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा आकर्षक पद्धतीने सजविण्यात आली होती. जुना बोरामणी नाका येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे तरुण मंडळाच्या वतीने डॉल्बी लावून मिरवणूक काढली होती. वीर फकिरा तरुण मंडळाने आकर्षक विद्युत रोषणाई करीत डॉल्बी लावून मिरवणूक काढली होती. सुंदर लायटिंग आणि फटाक्यांची आतषबाजी करीत तरुणांच्या आनंदाला उधाण आले होते. मिरवणुकीत रथामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेभोवती आकर्षक सजावट करण्यात आली होती. एस. एस. मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था व संशोधन संस्थेच्या वतीने भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली. चांदीच्या रथामध्ये डॉ. आंबेडकरांची प्रतिमा आणि अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेची आकर्षक सजावट करण्यात आली होती. संस्थापक सुहास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. विश्वास शिंदे, समाधान आवळे यांच्यासह हजारो कार्यकर्ते मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो... अशा घोषणा देत समाजबांधव आनंद साजरा करीत होते.
दलित स्वयंसेवक संघाच्या वतीने मिरवणुकीत पारंपरिक वाद्य वाजविले जात होते. हलगीचा निनाद, ढोल, ताशा, संबळ संगीताचा सूर आणि तुतारीच्या आवाजाने मिरवणुकीत रंगत आली होती. मिरवणुकीत आकर्षक पद्धतीने सजवलेले उंट आणि घोडे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. मिरवणुकीत दलित स्वयंसेवक संघाचे विजय पोटफोडे, गोविंद कांबळे, संजय लोंढे, आबा लोंढे, संतोष कांबळे आदी मान्यवरांसह लहान मुले, तरुण आणि समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यु. के. मित्र परिवारच्या वतीने उंट, घोडे, हलगी, संबळ, ताशा लावून मिरवणूक काढण्यात आली. तसेच डॉल्बीच्या आवाजावर तरुणाई नृत्य करीत होती. एम. के. मित्र परिवाराच्या वतीने डॉल्बीसह मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये लहूजी वस्ताद साळवे, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांच्या प्रतिमांची रथातून मिरवणूक काढण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेची आकर्षक पद्धतीने सजावट करण्यात आली होती. एम. के. मित्र परिवाराच्या वतीने एल.सी.डी. स्क्रीनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांची माहिती दिली जात होती. मातंग एकता आंदोलन संघटनेच्या वतीने रोहित खिलारे यांच्या नेतृत्वाखाली डॉल्बीसह मिरवणूक काढण्यात आली होती.
----------------------------------------
सामाजिक संस्थांच्या वतीने स्वागत...
अण्णाभाऊ साठे चौकात नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करून वाटप करण्यात आले.
४महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने युवराज चुंबळकर हे मिरवणुकांचे स्वागत करीत होते.
डॉ. आंबेडकर चौक (पार्क चौक) येथे क्रांतिवीर लहूजी शक्ती सेनेच्या वतीने मिरवणुकांचे स्वागत करण्यात येत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटोळे, जिल्हाध्यक्ष किसन जाधव, शहराध्यक्ष विजय अडसूळ आदी मान्यवर उपस्थित होते.
अण्णाभाऊ साठे चौकात विशाल खंदारे मित्र परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात येत होते.
गुलालाची मुक्त उधळण आणि संगीताच्या तालबद्ध आवाजावर लहान मुलांसह महिला, पुरुष आणि वृद्धदेखील मोठ्या उत्साहात आनंद साजरा करीत होते.