कॅन्सरग्रस्त मुलाचे लग्न लावून फसगत केल्याप्रकरणी सासूसह तिघास अटकपूर्व जामीन मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 14:59 IST2021-03-04T14:54:33+5:302021-03-04T14:59:44+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

कॅन्सरग्रस्त मुलाचे लग्न लावून फसगत केल्याप्रकरणी सासूसह तिघास अटकपूर्व जामीन मंजूर
सोलापूर :- तोंडाचा कॅन्सर झालेले माहिती असून ते न सांगता लग्न लावून देऊन औरंगाबाद येथील विवाहितेची फसगत केल्याप्रकरणी सासू संगीता रवींद्र राठोड वय ६० रा. हॉटगी रोड सोलापूर, माधवी महेश राठोड, वय ५२ रा: बनापुरा मध्यप्रदेश, गणेश नंदलाल राठोड वय:- ४६, रा. चितळे रोड अहमदनगर, यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.व्ही.मोहिते यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला.
यात हकीकत अशी की, औरंगाबाद येथील विवाहितेचे लग्न २६ फेब्रुवारी २०१९ रोजी विशाल राठोड सोबत झाले होते, त्यानंतर तिच्या पतीस लग्नापूर्वीपासून तोंडाचा कॅन्सर असल्याचे समजले ही बाब वरील तिघांनी लपवून ठेऊन लग्न केले त्यामुळे तिची फसगत झाली.सदरच्या कॅन्सरमधून १० जुलै २०२० रोजी तिच्या पतीचे निधन झाले. त्यावेळेस सासू संगीता हिने पतीचे पी एफ व ई एस आय मधील रक्कमा या तिच्या पतीचे लग्न झाले नाही अशी खोटी कागदपत्रे देऊन काढून घेतल्या,अशा आशयाची फिर्याद औरंगाबाद येथील विवाहितेने विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावर आपणास अटक होऊ नये म्हणून तिघांनी ॲड. मिलिंद थोबडे यांच्यामार्फत अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता.
अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस ॲड. मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तीवादात विशाल यास तोंडाचा कॅन्सर हा लग्नानंतर झाला तसेच विशालच्या पी एफ व ई एस आय च्या रकमेवर त्याची आई म्हणजे अर्जदार संगीता ही वारसदार म्हणून नाव होते त्या पृष्ठयार्थ न्यायालयात कागदपत्रे दाखल केली, त्यामुळे पिंकी हिची फसगत झाली असे म्हणता येणार नाही असा युक्तिवाद मांडला, त्यावर न्यायाधीशांनी १५ हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला. यात अर्जदार तर्फे ॲड.. मिलिंद थोबडे, ॲड. विनोद सूर्यवंशी, ॲड.. अमित सावळगी यांनी तर सरकार तर्फे ॲड.. शितल डोके यांनी काम पाहिले.