सोलापूरच्या उत्पादकांना जागतिक बाजारपेठेत निर्यातीच्या अनेक संधी : कुरूविल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 12:50 IST2019-07-02T12:43:29+5:302019-07-02T12:50:14+5:30
मुंबईच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरचे प्रमुख सोलापूर दौºयावर; ‘लोकमत’ शी साधला संवाद

सोलापूरच्या उत्पादकांना जागतिक बाजारपेठेत निर्यातीच्या अनेक संधी : कुरूविल्ला
सोलापूर : सोलापुरातील टॉवेल्स आणि चादरींना परदेशात चांगली मागणी आहे. वस्त्रोद्योगातील गुणवत्तापूर्ण वस्तूंचे येथे उत्पादन होत असते. जागतिक बाजारपेठेत सोलापूरच्या उत्पादकांना निर्यातीच्या चांगल्या संधी आहेत. त्याचा तुम्ही लाभ घ्या, असे आवाहन मुंबईच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरचे सल्लागार ए. ओ. कुरुविल्ला यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केले.
वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या चर्चासत्रात मार्गदर्शन करताना कुरुविल्ला बोलत होते. ते म्हणाले, जागतिक बाजारपेठेत भारताचा फक्त २.१ टक्के इतका वाटा आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने निर्यात वाढविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्यामुळे येथील वस्त्रोद्योगालाही मोठी चालना मिळेल.
वर्ल्ड ट्रेड सेंटरचे सल्लागार अरविंद खेडकर म्हणाले, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गुणवत्तापूर्ण उत्पादनाला चांगली मागणी आहे. ग्राहकांची आवड आणि गरज ओळखून उत्पादन बनवा, तरच तुम्ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करू शकाल. साडेतीन कोटी लोकांना वस्त्रोद्योगाच्या माध्यमातून देशात रोजगार उपलब्ध होतो. वस्त्रोद्योगामध्ये जगात भारताचा निर्यातीमध्ये दुसरा क्रमांक लागतो. आगामी काळात मेक इन इंडियाच्या मार्फत निर्यातीसाठी अनेक संधी उद्योजकांना उपलब्ध आहेत. त्याचा लाभ येथील उत्पादकांनी घ्यावा, असे सांगून त्यांनी निर्यातीबाबतच्या अनेक बाबी सहजसुलभरीत्या उदाहरणासह स्पष्ट केल्या.
राज्य सरकारच्या मैत्री या पोर्टलच्या माध्यमातून निर्यातीसंबंधी आवश्यक कागदपत्रे आणि इतर संबंधित बाबींची माहिती यशस्वी कुलकर्णी आणि आरुषी सक्सेना यांनी दिली. टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे चेअरमन राजेश गोसकी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा सोलापूर टॉवेल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शंभर उत्पादकांनी चर्चासत्रात भाग घेतला. उद्योग निरीक्षक अनिल साळुंखे यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक बी. टी. यशवंते, उद्योग निरीक्षक संजय खेबायत, टेक्स्टाईल फाउंडेशनचे संजय मडूर, सिद्धेश्वर गड्डम, गोविंद बुरा, संजय आकेन, वेणुगोपाल अल्ली, पुरुषोत्तम उडता, अमित राठी यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.
सोलापुरात सप्टेंबरमध्ये व्हायब्रंट टेरी टॉवेलचे प्रदर्शन
- राजेश गोसकी यांनी प्रास्ताविकात सांगितले की, येथे येत्या २५ ते २७ सप्टेंबरपर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्हायब्रंट टेरी टॉवेल प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यामध्ये देशभरातील उत्पादक सहभागी होणार आहेत. त्या अनुषंगाने येथील उत्पादकांना निर्यातीसंबंधी माहिती मिळण्यासाठी या चर्चासत्राचे वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबईच्या सहकार्याने आयोजन केले होते.