अबब... पपईचं वजन चक्क पाच किलो! सोलापुरातील शिक्षकांच्या बागेतील फळ
By काशिनाथ वाघमारे | Updated: May 13, 2023 16:37 IST2023-05-13T16:36:17+5:302023-05-13T16:37:23+5:30
सहा ते नऊ महिन्यात पपईचे रोप सहा फूट उंचीचे झाले असून त्याला फळधारणाही झाली.

अबब... पपईचं वजन चक्क पाच किलो! सोलापुरातील शिक्षकांच्या बागेतील फळ
सोलापूर : साधारणत: पपईचे वजन आजपर्यंत दोन किलो ते अडीच किलोपर्यंतचे पाहिले असाल. मात्र चक्क पपईचे वजन पाच किलो असल्याचे दुर्मीळ उदाहरण सोलापुरात होटगी रोडवरील भारत नगरात एका शिक्षकाच्या बागेत पाहायला मिळाले आहे.
ग्रामीण भागातून नोकरीनिमित्त होटगी रोडवर स्थायिक झालेले शिक्षक हणमंत बिज्जरगी यांच्या परसबागेतील हा अनुभव आहे.
बिज्जरगी हे ग्रामीण भागातून आलेले असून त्यांना शेतीचाही अनुभव आहे. शहरात अनेक वर्षांपासून राहात असलो तरी घराच्या आवारात हिरवाई फुलवणं हे कोणालाही स्वस्थ बसू देत नाही. त्यांच्या पत्नीने आवारात केळीची चार रोपं लावली. त्या रोपाचं संगोपन करीत असताना त्याच्याच बाजूला खडकाळात नकळतपणे एक पपईचे झाड उगवले. त्याला त्यांनी केळीच्या रोपाबरोबर वाढवलं.
सहा ते नऊ महिन्यात पपईचे रोप सहा फूट उंचीचे झाले असून त्याला फळधारणाही झाली. या काळात पाच पपई फळं लागले आणि त्यापैकी एक फळ चक्क पाच किलो ८०० ग्रॅम वजनाचे असल्याची नोंद झाली आहे. बाकीची फळे ही दोन-अडीच किलो वजनातील आहेत. मात्र एक फळ चक्क दुपटीच्या वजनाएवढे लगडल्याने अनेकांना नवल वाटू लागले आहे. मात्र कृषिप्रधान बिज्जरगी कुटुंब मात्र यामागील शास्त्रीय कारणांचा शोध घेत आहे.
पपईचे वजन दोन-अडीच किलोपर्यंत असू शकते. मात्र दुप्पटीच्या वजनाइतके फळ हे दुर्मीळ आणि ॲबनॉर्मल ठरतं. अशा फळापासून काही नुकसान नाही. याकडे जेनेटिक चेंजेस म्हणून पाहिले जाते. मनुष्यात, जनावरातही असे बदल अलीकडे पहायला मिळत आहे. तसाच एखादा बदल पाहतोय.
- बाळासाहेब शिंदे, कृषितज्ज्ञ