पैलवानांना 'पाॅवर' इंजेक्शन विकणाऱ्या तीन मेडिकलचा परवाना रद्द, धैर्यशील मोहिते-पाटीलांनी केली होती तक्रार
By बाळकृष्ण दोड्डी | Updated: January 6, 2023 22:45 IST2023-01-06T22:44:54+5:302023-01-06T22:45:28+5:30
Solapur News: कुस्तीपटूंना तसेच जीम मधील बॉडी बिल्डरांना पॉवर देणाऱ्या 'मेफेन टेरेफिन सल्फेट' या इंजेक्शनची बेकायदा विक्री करणाऱ्या तीन मेडिकलचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

पैलवानांना 'पाॅवर' इंजेक्शन विकणाऱ्या तीन मेडिकलचा परवाना रद्द, धैर्यशील मोहिते-पाटीलांनी केली होती तक्रार
- बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : कुस्तीपटूंना तसेच जीम मधील बॉडी बिल्डरांना पॉवर देणाऱ्या 'मेफेन टेरेफिन सल्फेट' या इंजेक्शनची बेकायदा विक्री करणाऱ्या तीन मेडिकलचा परवाना रद्द करण्यात आला आहे. जिल्हा अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली असून संबंधीत मेडिकल चालकांवर गुन्हा नोंदवण्याची तक्रार औषध प्रशासनाने पाेलिसांकडे दिली आहे.
अकलूज येथील दीपक मेडिकल, वेळापूर येथील राजलक्ष्मी मेडिकल तसेच श्रीपूर येथील ओमसाई मेडिकलवर ही कारवाई झाली आहे. मेफेन टेरेफिन सल्फेट या इंजेक्शनची बेकायदा विक्री होत असल्याची तक्रार अकलुजचे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे केली होती. ५ डिसेंबरला तक्रार आल्यानंतर औषध प्रशासनाकडून चौकशी सुरु झाली. चौकशीनंतर २१ डिसेंबर रोजी संबंधीत तीन मेडिकल चालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यानंतर ३० डिसेंबर रोजी परवाना रद्द करण्यात आला. त्यानंतर संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्याची तक्रार औषध प्रशासनाने पोलिसांकडे दिली आहे. या प्रकरणी आणखी काही मेडिकलची चौकशी सुरू असून त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, अकलूज येथील दीपक मेडिकलने तीन वर्षात आठ हजाराहून अधिक इंजेक्सशनची विक्री केली आहे. राजलक्ष्मी तसेच ओमसाई मेडिकल या दोघांना दीपक मेडिकलने इंजेक्शनचा पुरवठा केला आहे, अशी माहिती औषध प्रशासनाचे अरुण गोडसे यांनी दिली.