सोलापूर : एका भागात राहत्या घरात तरुणाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार १ जानेवारी रोजी सायंकाळी ७:३० वाजता घडला. याप्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
वेणुगोपाळ श्रीकांत विटकर (रा. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो अल्पवयीन मुलीच्या पाठीमागे जाणे, तिला बोलण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारे त्रास देत होता. एके दिवशी त्याने त्या मुलीला प्रपोज केले. मुलीने हा प्रकार आई-वडिलांना सांगितला. मुलीचे वडील, काका व चुलत भावाने तरुणाला ताकीद दिली होती. मात्र वेणुगोपाळ याच्या वागण्यात फरक पडला नव्हता.
तो मुलीचा वारंवार पाठलाग करीत होता, तिला रस्त्यावर कोठेही अडवून बोलण्याचा प्रयत्न करीत होता. त्यामुळे मुलीच्या घरच्यांनी पुन्हा त्याच्या घरी जाऊन त्याच्या आई- वडिलांना हा प्रकार सांगितला होता. मात्र तरुणाला काही फरक पडला नव्हता. त्यामुळे मुलीने त्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली, अशी फिर्याद मुलीच्या वडिलांनी दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता कलम १०८, सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम १२ प्रमाणे 'पोक्सो' प्रमाणे गुन्हा दाखल झाला.
दरवाजा तोडून काढले बाहेरमुलगी घरातील बेडरूममध्ये गेली, आतून कडी लावली. काही वेळानंतर घरातील लोकांनी आवाज दिला तरी त्याला प्रतिसाद देत नव्हती. शेवटी नातेवाइकांनी दार तोडून आत प्रवेश केला. तेव्हा ती पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. हवालदार व्ही.जी. जमादार यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. याची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.