लोकोपायलटच्या सतर्कतेमुळे महिलेचे प्राण वाचले
By दिपक दुपारगुडे | Updated: March 9, 2024 21:41 IST2024-03-09T21:40:52+5:302024-03-09T21:41:27+5:30
एक महिला अचानक रुळामध्ये येऊन थांबली असल्याचे लोकोपायलटच्या निदर्शनास आले.

लोकोपायलटच्या सतर्कतेमुळे महिलेचे प्राण वाचले
सोलापूर : धावत्या परळी-पनवेल (गाडी नं १७६१४) रेल्वे गाडी समोर रुळामध्ये उभारलेल्या एका महिलेचे प्राण लोकोपायलटच्या प्रसंगावधानामुळे वाचले. ही घटना लातुर रेल्वे स्टेशन स्टाटर समोर घडली.
परळी-पनवेल (गाडी नं १७६१४) ही लातुर स्थानकातून निघाली होती. अवघ्या काही अंतरावरच स्टाटर सिग्नल समोर एक महिला अचानक रुळामध्ये येऊन थांबली असल्याचे लोकोपायलटच्या निदर्शनास आले.
गाडीचे लोकोपायलट एस पी.वाघमारे व सहा लोकोपायलट प्रदीप शेळके यांनी गाडीचा हाॅर्न वाजवून त्या महिलेला बाजूला होण्यासाठी सतर्क केले. परंतू सदर महिला ही रुळातून बाजूला हटत नसल्यामुळे सदर गाडीच्या चालकांनी प्रसंगावधान राखून गाडी थांबवली.
महिलेची विचारपूस करुन तिला पाणी पाजले व स्टेशनवरील आरपीएफ जवानांना काॅल करुन बोलावले आणि त्या महिलेला त्या आरपीएफ जवानांच्या ताब्यात देऊन गाडी कुर्डुवाडीकडे रवाना झाली. महिलेचा प्राण वाचवून होणारी दुर्घटना रेल्वे चालकांच्या प्रसंगावधानामुळे टळली.याबाबत चालकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.