देऊळ बंद : तरी विठ्ठल मंदिराला ७१ लाख रुपये वीजबिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:22 IST2021-09-03T04:22:52+5:302021-09-03T04:22:52+5:30
कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील मंदिरे जवळपास १५ महिने झाले बंद आहेत. यामुळे मंदिर समितीला उत्पन्न घटले आहे; परंतु वीज बिल ...

देऊळ बंद : तरी विठ्ठल मंदिराला ७१ लाख रुपये वीजबिल
कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील मंदिरे जवळपास १५ महिने झाले बंद आहेत. यामुळे मंदिर समितीला उत्पन्न घटले आहे; परंतु वीज बिल व इतर खर्च सुरूच आहे. यंदा ७१ लाख रुपयांचे वीज बिल मंदिर समितीला भरावे लागले आहे. मंदिरे बंद असली तरी देवाचे नित्योपचार नियमानुसार सुरू आहेत. मंदिराचे भक्त निवास, दर्शन मंडप आणि इतर उपक्रमांचा खर्चही सुरूच आहे. यामुळे आता मिळणारे तोकडे उत्पन्न वीज बिल भरले जाऊ लागल्याने कर्मचारी पगार आणि इतर खर्च मंदिर समितीने बँकेत ठेवलेल्या ठेवींमधून करावा लागणार आहे.
विठ्ठल मंदिर बंद असल्याने जवळपास ६० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. दरवर्षी विठ्ठल मंदिराला विविध माध्यमातून जवळपास ३२ ते ३५ कोटींचे उत्पन्न मिळत असते. सध्या मात्र मंदिराबाहेर नामदेव पायरी येथे असलेल्या पेटीत भाविकांकडून टाकलेल्या पैशातून मंदिराचा खर्च सुरू आहे. या पेटीमध्ये महिन्याला साधारण ८ ते ९ लाख रुपये जमा होतात. मात्र, याचवेळी विठ्ठल मंदिर, २७२ रूमचे भक्त निवास, तुकाराम भवन, दर्शन मंडप, गोशाळा अशा मंदिराच्या उपक्रमांसह येणारे वीज बिल महिन्याला जवळपास ७ लाख रुपये येते. म्हणजे पेटीत जमणाऱ्या उत्पन्नातील ८४ टक्के रक्कम नुसते वीज बिल भरण्यासाठी जाते.
-----
म्हणून निर्माण झाला प्रश्न
वास्तविक जेव्हा मंदिर सुरू असते तेव्हा मंदिराचे वीज बिल महिन्याला १२ ते १३ लाखांपर्यंत येत असते. अशा वेळी मंदिराचे उत्पन्नही महिना सरासरी अडीच ते तीन कोटींपर्यंत असल्याने या बिलाची अडचण भासत नसायची. मंदिरे उघडी असताना विठ्ठल मंदिराचा वर्षभराचा वीज बिलाचा खर्च जवळपास १ कोटी ४४ लाखांपर्यंत असतो. तर मंदिर कर्मचाऱ्यांचे पगार वर्षाला ४ कोटी २० लाख रुपये असतात. देवाच्या नित्योपचाराला सरासरी वर्षाला २१ लाखांचा खर्च येतो; पण सध्या लॉकडाऊनमुळे भाविकांकडून येणारे उत्पन्न थांबले असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.