दाखल्यासाठी शंभर रुपयांची लाच घेतली
By Admin | Updated: August 22, 2014 00:47 IST2014-08-22T00:47:22+5:302014-08-22T00:47:22+5:30
महिला लिपिकाला रंगेहाथ पकडले

दाखल्यासाठी शंभर रुपयांची लाच घेतली
सोलापूर : शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी तक्रारदाराकडून शंभर रुपयांची लाच घेताना लालबहादूर हायस्कूलच्या महिला लिपिकाला गुरुवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या पथकाने रंगेहाथ पकडले़
माधुरी भरत उपाध्ये असे लाच स्वीकारताना सापडलेल्या महिला लिपिकाचे नाव आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, सिव्हिल चौकातील नाथ प्राईड इमारतीमागील लालबहादूर शाळेत तक्रारदाराच्या बहिणीचे शिक्षण झाले़ काही दिवसांपूर्वी शाळा सोडल्याचा दाखला मिळवण्यासाठी भावाला घेऊन ती शाळेत गेली़ यावेळी महिला लिपिक माधुरी उपाध्ये यांनी दाखला देण्यासाठी दीडशे रुपयांची लाच मागितली़ मात्र, शंभर रुपयांवर तडजोड झाली़ तत्पूर्वी तक्रारदाराने रंगभवन येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना भेटून तक्रार नोंदवली़
ठरल्याप्रमाणे गुरुवारी शाळेभोवती सापळा लावण्यात आला़ तक्रारदाराकडून शंभर रुपये घेताना पथकाने रंगेहाथ पकडले़ सायंकाळी उशिरापर्यंत जेलरोड पोलिसात या गुन्ह्याची नोंद सुरु होती़