भाजी विक्रेत्या आई-बाबांच्या कष्टाचं चीज; मुलगी ४९२ रँकने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण
By शीतलकुमार कांबळे | Updated: April 17, 2024 18:28 IST2024-04-17T18:26:42+5:302024-04-17T18:28:56+5:30
आपल्या आई-बाबांचं कष्टाचं चीज मुलीने यूपीएससी उत्तीर्ण होऊन केलं. स्वाती राठोड असे या मुलीचे नाव असून ४९२ वी रँक घेत तिने हे मोठे यश मिळविले.

भाजी विक्रेत्या आई-बाबांच्या कष्टाचं चीज; मुलगी ४९२ रँकने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण
सोलापूर : सुरुवातीला मुंबईत मजुरी त्यानंतर सोलापुरात गाड्यावर भाजी विक्री केली. सतत कष्ट उपसत मुलांना शिकवले. आपल्या आई-बाबांचं कष्टाचं चीज मुलीने यूपीएससी उत्तीर्ण होऊन केलं. स्वाती राठोड असे या मुलीचे नाव असून ४९२ वी रँक घेत तिने हे मोठे यश मिळविले.
स्वाती मोहन राठोड हिचे आई-वडील हे विजापूर रोड, राजस्व नगर येथे राहतात. याच परिसरात आई-वडील दोघे मिळून भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. वडील भाजीचा गाडा घेऊन परिसरात भाजी विकत फिरतात. या व्यवसायाला आईचीही मदत असते. आपल्या आई-बाबांचे कष्ट पाहून मी यूपीएससी उत्तीर्ण होईनच अशी जिद्द बाळगत स्वातीने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. पाचव्या प्रयत्नात तिला हे यश मिळाले.
स्वाती राठोड हिचे दहावीपर्यंतचे शिक्षण नवी मुंबईतील वाशी येथे झाले. तिथे तिचे वडील मजुरी करत होते. त्यानंतर राठोड कुटुंबीय सोलापुरात स्थायिक झाले. तेव्हापासून ते भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. या दरम्यान स्वातीने भारती विद्यापीठ येते अकरावी, बारावीचे शिक्षण घेतले. वसुंधरा महाविद्यालयात बीए पूर्ण केले. सध्या भूगोल विषयातून ती एम.ए. करत आहे. तिला एक भाऊ असून दोन बहिणी आहेत.
यूपीएससी परीक्षेसाठी मी स्वत: अभ्यास केला, तर फक्त ऑप्शनल विषयासाठी क्लास लावला होता. सिनिअरनी सांगितलेले पुस्तके अभ्यासासाठी वापरले, प्रश्नपत्रिका सोडविल्या. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणे हे माझे स्वप्न पूर्ण झाल्याने आनंद होत आहे. मागील काही निकाल पाहता मला आयएएसची पोस्टिंग मिळेल अशी अपेक्षा आहे.
- स्वाती राठोड, यूपीएससी उत्तीर्ण, विद्यार्थिनी