खड्ड्यात अडकून दुचाकीस्वार उसाच्या ट्राॅलीखाली चिरडला
By काशिनाथ वाघमारे | Updated: February 3, 2024 17:08 IST2024-02-03T17:07:39+5:302024-02-03T17:08:20+5:30
मासे खरेदी भोवली : बार्शी-तुळजापूर रोडवरील अपघात.

खड्ड्यात अडकून दुचाकीस्वार उसाच्या ट्राॅलीखाली चिरडला
काशिनाथ वाघमारे, सोलापूर: बार्शी बसस्थानकासमोर तुळजापूर रोडवर खड्ड्यात अडकून एक दुचाकीस्वार उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीखाली चिरडून ठार झाला.
प्रदीप उत्तरेश्वर चव्हाण (वय ३०, रा. यशवंतनगर, बार्शी) असे मरण पावलेल्या मोटारसायकलस्वाराचे नाव आहे. हा अपघात तुळजापूर रोडवर मारुती मंदिराजवळ २ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास झाला. मृत प्रदीपचा भाऊ शुभम चव्हाण याने बार्शी शहर पोलिसांत ३ फेब्रुवारी रोजी फिर्याद दिली.
पोलिस सूत्राकडील माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. एमएच १३ एजे ७८५८) ही तुळजापूर रोडवरून एका साखर कारखान्याकडे निघालेली होती. दरम्यान प्रदीप चव्हाण हा येथून मित्राच्या दुचाकीवरून (क्र. एमएच १३ सीएफ ०१८१) पोस्ट चौकात मासे खरेदीसाठी आला होता. तो परत याच रोडवरून घराकडे जात होता.
अपघातस्थळी रस्त्यावरील खड्ड्यात त्याची दुचाकी अडकली आणि तो येथून निघालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडला आणि चिरडून जागीच मृत पावला. अपघाताची माहिती मिळताच बार्शी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पुढील तपास पोलिस नाईक अडसूळ करत आहेत.