कुर्डूवाडी - कुर्डूवाडी पंढरपूर रोडवरून हिरोहोंडा मोटसायकलवरून प्रवास करीत असताना त्रिमूर्ती हॉटेलच्या उत्तेरेस १५० मीटर अंतरावर कुर्डू (ता माढा) शिवारात समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या एसटीने धडक दिल्याने २७ वर्षीय तरुणाचा उजव्या टायर खाली सापडून जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
या अपघातात विकास सर्जेराव अडागळे (वय-२७,रा सिरसदेवी, ता गेवराई,जि बीड) याचा मृत्यू झाला आहे. याबाबत मयताचा भाऊ श्याम सर्जेराव अडागळे(रा सिरसदेवी, ता गेवराई,जि बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एसटी चालक महादेव खंडेराव घोरपडे (वय -५५, रा. नाथरा, ता.परळी जि बीड) याच्याविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कुर्डूवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.