जिल्ह्यात मघा नक्षत्राची जोरदार हजेरी
By Admin | Updated: August 22, 2014 00:50 IST2014-08-22T00:50:00+5:302014-08-22T00:50:00+5:30
खरिपाला दिलासा: विश्रांतीनंतरच्या पावसाने बळीराजा आनंदला; खरीप पिकांना दिलासा

जिल्ह्यात मघा नक्षत्राची जोरदार हजेरी
सोलापूर: प्रदीर्घ विश्रांतीनंतर जिल्ह्यात आज मघा नक्षत्रातील पावसाने दमदार हजेरी लावली. पंढरपूर, माळशिरस, मोहोळ, करमाळा, माढा तालुक्यात सायंकाळनंतर जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अन्य तालुक्यातही पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त आहे.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात प्रदीर्घ विश्रांतीनंतर विविध ठिकाणी पाऊस पडू लागला आहे. आज सायंकाळनंतर मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
मोहोळ तालुक्यातही रात्री ८ वाजल्यापासून मघा नक्षत्रातील पावसाने जोरदार हजेरी लावली. तालुक्यातील पेनूर, टाकळी, पाटकूल, कोन्हेरी, खवणी, सारोळे, कोळेगाव, लांबोटी परिसरात जोरदार पाऊस झाला.
यापूर्वीच्या हमखास पाऊस पडणाऱ्या नक्षत्रांनी फारसा दिलासा न दिल्याने खरिपाचे क्षेत्र धोक्यात आले आहे. या पावसामुळे थोडक्याशा पावसाने उगवण झालेल्या खरिपाच्या पिकांबरोबरच बागायती पिकांनाही दिलासा मिळाला आहे.
अक्कलकोट तालुक्यातही सायंकाळी ६ पासून पावसाने हजेरी लावली. हा पाऊस चपळगाव, मैंदर्गी, दुधनी, हन्नूर, नागणसूर, सलगर, वागदरी, जेऊर भागात झाला.
पंढरपूर : रिमझिम पडणाऱ्या पावसाने बुधवारी रात्री अचानक मुसळधार पडण्यास सुरुवात केल्याने पंढरपूर शहरातील सखल भागात पाणी साठून नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. काही वेळा १० ते १५ मिनिटे पावसाच्या रिमझिम सरी पडायच्या. सोमवारी ढगाळ वातावरण होते. मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास शहरात पाऊस पडला होता. बुधवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास पाऊस पडण्यास सुरुवात झाली. मुसळधार पाऊस तब्बल दीड तास पडत होता.
कुर्डूवाडी/करमाळा : करमाळा व कुर्डूवाडीत आज गुरुवारी दुपारी अडीच ते साडेतीनपर्यंत एक तास पावसाने झोडपून काढले. गेल्या महिनाभरापासून दडी मारुन बसलेल्या पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने ऐन पोळा सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुटले आहे.
यंदाच्या मान्सूनमध्ये रोहिणी, मृग, आर्द्रा, पुष्य ही नक्षत्रे कोरडी गेली, पुनर्वसू नक्षत्रात थोड्याफार प्रमाणात पाऊस पडला यामुळे शेतकऱ्यांनी पुढील पावसाच्या भरवशावर खरीप हंगामात ५० टक्के क्षेत्रावर पेरण्या केल्या पण पुढे पुष्य नक्षत्र कोरडे गेल्याने दुबार पेरणीचे संकट आले होते. करमाळा व कुर्डूवाडी परिसरात टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरु आहेत. खरिपाची दुबार पेरणी करुनही पाऊस नसल्याने वाया गेली आहे; मात्र मघा नक्षत्राच्या प्रारंभापासून पावसाने हजेरी लावली आहे.
आज गुरुवार कुर्डूवाडी शहरात पोळ्याचा बाजार असल्याने शेतकऱ्यांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. यात बैलांना सजविण्यासाठीचे साहित्य व इतर खरेदी करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना पावसात भिजत जावे लागले. अनेक ठिकाणी पाणी साचले होते. विविध बंधाऱ्यात पाणी आले असून, शेततळी व ताली पाण्याने भरल्या आहेत.
करमाळा शहरासह जेऊर, वांगी, चिकलठाण, कंदर, रावगाव, पिंपळवाडी, मोरवड, वीट, आदी भागात बुधवारी रात्री तब्बल दीड तास मुसळधार पाऊस पडला. या पावसाने ओढ्यांना पाणी वाहिले.
माढा : माढा शहर व परिसरात बुधवारी रात्री व गुरुवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. गेल्या २० ते २२ दिवसांपासून पावसाने विश्रांती दिली होती. मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांना तात्पुरता का होईना दिलासा मिळाला आहे. रणदिवेवाडी, वेताळवाडी, वडश्ािंगे, सापटणे (भोसे), उपळाई (खुर्द), उपळाई (बु.), जाधववाडी, शिंदेवाडी, उंदरगाव, केवड, विठ्ठलवाडी, लोंढेवाडी, खैरेवाडी आदी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून अधून मधून पावसाने हजेरी लावली आहे.
या पावसामुळे शेतातील तालीमध्ये पाणी साचले आहे तर अनेक बंधाऱ्यात पाणी आले आहे. लहान-लहान ओढ्यातही पाणी आले आहे.
अकलूज : प्रदीर्घ विश्रांतीनंतर गुरुवारी सायंकाळी ४ वाजता मेघगर्जनेसह आलेल्या पावसाने अकलूजसह पूर्व भागात हजेरी लावली. अर्धा तास झालेल्या या पावसात वाघोलीचा आठवडा बाजार विस्कळीत झाला.
गेल्या २-३ दिवसांपासून उकाडा जाणवत होता. गुरुवारी सायंकाळपर्यंत चांगला पाऊस पडेल असे बोलले जात होते. सायंकाळी ४ वाजता आकाशात मेघांनी गर्दी केली आणि ४ वाजता मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. अकलूजसह यशवंतनगर, चौंडेश्वरवाडी, चाकोरे, आनंदनगर, गिरझणी, संग्रामनगर, माळीनगर, माळेवाडी (अ), महाळुंग, श्रीपूर, वाघोली, वाफेगाव, गणेशगाव, तांबवे, सवतगव्हाण, वेळापूर, उघडेवाडी, माळखांबी, बोरगाव या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली.
अकलूज परिसरात झालेल्या पावसाने अकलूज येथील शिवशंकर बझारसमोरील सांडपाण्याच्या गटारी तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरच साठले. त्यामुळे काही काळ वाहतूक खोळंबली. सायंकाळी ५ वाजता शाळा सुटल्यानंतर या पावसाच्या पाण्यातून वाट काढत विद्यार्थ्यांनी घर गाठले.
उत्तर सोलापूर तालुक्यातही मघाच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. दोन दिवसांपासून रिमझिम पावसाने हजेरी लावली होती. आज रात्री जोरदार पाऊस झाला. हा पाऊस वडाळा, नान्नज, बीबीदारफळ, गावडी दारफळ, रानमसले, कारंबा, गुळवंची, मार्डी, होनसळ, तिऱ्हे आदी भागात झाला. अन्यत्र रिमझिम का होईना सरी पडल्या. बार्शी तालुक्यात रात्री आठपासून जोरदार पाऊस सुरु झाला. शेंद्री, भोर्इंजे, खांडवे, वांगरवाडी, धस पिंपळगाव, देवगाव, शेलगाव आदींसह तालुक्याच्या उत्तर भागात हा पाऊस सुरु होता.
-------------------------------
पंढरीत रेल्वे पुलाखाली पाणी
४शहरातील सखल भागात पाणी साठले होते. यामध्ये तालुका पोलीस ठाण्याच्या रेल्वे पुलाखाली पाणी साठले होते. रेल्वे स्टेशनकडून येणाऱ्या दुचाकी रस्त्यालगतच्या खड्ड्यात अडकून पडत होत्या. यामुळे अनेक वाहनधारकांना गाड्या खड्ड्याबाहेर काढण्यासाठी कसरत करावी लागली.
पावसाची टक्केवारी
४ पंढरपूर : ४६, कासेगाव : २१.३०, पुळूज : निरंक, तुगंत : २, करकंब : ०.५, भाळवणी : ०.१४, भंडीशेगाव : २७, पटवर्धन कुरोली : ७.२०, चळे : ९.३०.
वाघोलीचा बाजार विस्कळीत
४ पूर्व भागातील वाघोली येथे गुरुवारचा आठवडा बाजार भरतो. बैलपोळा सणाच्या निमित्ताने बाजारात गर्दी झाली होती. सायंकाळी अचानक मेघगर्जनेसह आलेल्या पावसाने बाजारकरी व व्यापारी यांची एकच धांदल उडाली. या पावसात वाघोलीचा आठवडा बाजार विस्कळीत झाला. पावसाने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. परंतु प्रदीर्घ विश्रांतीनंतर आलेल्या जोरदार पावसाने बळीराजा मात्र सुखावला.