पंढरपूर : आ. रणजितसिंह मोहिते- पाटील यांच्याबाबत भाजप जिल्हाध्यक्ष व माळशिरसचे उमेदवार राम सातपुते यांनीही तक्रार केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावर गंभीरपणे कारवाई करतील, असे स्पष्ट मत आ. श्रीकांत भारतीय यांनी मांडले. जे जे चुकीचं वागलेत, त्या सर्वांना त्यांची जागा दाखवली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
महायुतीच्या विजयानंतर श्रीकांत भारतीय यांनी गेल्या शुक्रवारी विठ्ठल मंदिरात येऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी विरोधकांवर टीका केली. यावेळी भारतीय म्हणाले, रोज सकाळी वाजणाऱ्या भोंग्याचे सेल आता संपले. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी ईव्हीएमवर आरोप केले असते तर समजू शकलो असतो. मात्र, राज्यातील ९ कोटी जनतेने विरोधकांना चांगला धडा शिकवला आहे.
ज्येष्ठ आणि शीर्षस्थ नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते शरद पवार देखील यात सामील झाले हे दुर्दैव आहे. निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आता ईव्हीएमवर आरोप करणे हा रडीचा डाव आहे. राज्यात मिळालेलं यश हे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या सामूहिक नेतृत्वाचे असून, राज्यात आता भाजपचं सरकार येत असून, मुख्यमंत्रीही भाजपचा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रणजितदादांनी घेतली बावनकुळेंची भेटएकीकडे रणजितसिंह मोहिते- पाटील यांच्यावर कारवाईची मागणी होत असताना दुसरीकडे रणजितसिंह मोहिते-पाटील मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. या भेटीमुळे वेगळी चर्चा सुरु झाली आहे.