सांगली : बहुचर्चित शेरीनाला योजनेच्या चाचणीला सुरूवात झाली असून गेल्या दोन दिवसांपासून शेरीनाल्यातील पाणी उचलून धुळगावकडे सोडण्यात आले आहे. आज, सोमवारी सायंकाळपर्यंत दोन किलोमीटर पाणी गेले असून उद्यापर्यंत कवलापूर पंपगृहात पाणी पोहोचेल, असे पालिका सूत्रांनी सांगितले. त्यामुळे लवकरच शेरीनाल्याचा प्रश्नही कायमस्वरुपी निकालात निघणार आहे. महापालिकेच्या बहुचर्चित शेरीनाला योजनेच्या चाचणीचा मुहूर्त अनेकदा टळला होता. या योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे होते. पालिकेतील विरोधी स्वाभिमानी विकास आघाडी आणि धुळगाव ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर ३१ जुलैपर्यंत चाचणी घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे शेरीनाल्याच्या चाचणीकडे सांगलीसह धुळगावकरांचेही लक्ष लागले होते. पण वीज कनेक्शनचे काम अपूर्ण राहिल्याने जुलैअखेरचा मुहूर्तही टळला होता. महापालिकेनेही उर्वरित एक कोटीची रक्कम जीवन प्राधिकरणला दिल्यानंतर अपूर्ण कामाला वेग आला. गेल्या दोन दिवसांपासून शेरीनाला योजनेचे ३०० एचपीचे तीन पंप सुरू करण्यात आले आहेत. नाल्यातील पाणी उचलून ते कवलापूरकडे सोडण्यात आले आहे. सांगली ते कवलापूर हा नऊ किलोमीटरचा टप्पा पूर्ण करून उद्यापर्यंत पाणी पंपगृहात पोहोचेल. त्यानंतर धुळगावच्या दहा किलोमीटरच्या टप्प्यात पाणी सोडले जाणार आहे. आज सोमवारी दुपारी उपमहापौर प्रशांत पाटील मजलेकर, स्थायी सभापती राजेश नाईक, आयुक्त अजिज कारचे यांनी शेरीनाला योजनेच्या प्राथमिक चाचणीची पाहणी केली. (प्रतिनिधी)शेरीनाल्याची योजना आता कार्यान्वित झाली आहे. सांगलीतील पंपगृहातून धुळगावला दोन दिवसात पाणी पोहोचणार आहे. धुळगाव येथील आठ पाँडमध्ये पाणी सोडून ते शुद्ध करून शेतीला दिले जाणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात धुळगावमधील शेतीच्या पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी निकालात निघून ३०० एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. धुळगावमधील वितरण व्यवस्था पूर्ण झाल्यास सुमारे दीड हजार एकर शेतीला या पाण्याचा लाभ मिळेल.
शेरीनाल्याच्या चाचणीस प्रारंभ
By admin | Updated: August 11, 2014 23:32 IST