पंढरपूरजवळ एसटी बस व ट्रकचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, सहा जखमी
By Appasaheb.patil | Updated: August 25, 2022 15:35 IST2022-08-25T15:35:20+5:302022-08-25T15:35:39+5:30
हा अपघात सोनके येथे गुरूवारी सकाळी १२ च्या सुमारास झाला. या अपघातात एसटी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पंढरपूरजवळ एसटी बस व ट्रकचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, सहा जखमी
सोलापूर : पंढरपूरहून आटपाडीकडे जाणारी एसटी बसला पंढरपूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली. या अपघातात एसटी बसमधील दोन प्रवाशी जागीच ठार झाले असून ६ जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा अपघात सोनके येथे गुरूवारी सकाळी १२ च्या सुमारास झाला. या अपघातात एसटी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पंढरपूरहून आटपाडीकडे जाणाऱ्या एसटी बसला समोरून येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली. या अपघातात ट्रकच्या व एसटीच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात दोन प्रवाशी जागीच ठार झाले असून ६ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पंढरपूर ग्रामीण पोलिस दलाचे निरीक्षक धनंजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अपघातातील जखमींना उपचारासाठी रूग्णालयात हलविले. मागील काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात अपघातांची संख्या वाढत आहे. त्यात अनेकांचा जीव जात आहे.