अवघी ४४ टक्के पेरणी
By Admin | Updated: October 23, 2014 14:38 IST2014-10-23T14:38:42+5:302014-10-23T14:38:42+5:30
उत्तर सोलापूर तालुक्याच्या काही भागात पडलेल्या पावसामुळे रब्बी पेरणीची लगबग सुरू असून या आठवडाअखेर ४४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

अवघी ४४ टक्के पेरणी
अरुण बारसकर ■ सोलापूर
उत्तर सोलापूर तालुक्याच्या काही भागात पडलेल्या पावसामुळे रब्बी पेरणीची लगबग सुरू असून या आठवडाअखेर ४४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे; मात्र परतीचा पाऊस पडला नसल्याने पेरणी झालेल्या उगवणीवर परिणाम होणार असल्याने शेतकरी अडचणीत येणार आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील शेती बागायती बिनभरवशाची झाली आहे. सीना नदीकाठच्या गावातील शेती बागायती करण्यासाठी मोठा खर्च करुनही नदीत बारमाही पाणी नसल्याने पिके अडचणीत येत आहेत. सीनेत कधी तरी पाणी असते. बंधारे असूनही पाण्याअभावी कोरडे असतात. त्यामुळे नदीकाठची शेतीही भरवशाची राहिली नाही. नदीकाठची पाच-सहा गावे वगळली तर अन्य गावे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. पावसावर अवलंबून असलेली शेती दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अडचणीची ठरणार आहे. पूर्ण पावसाळ्यात तालुक्यात ७५ टक्के पाऊस पडला असला तरी तो सर्वत्र नाही.
एकाचवेळी धो-धो पडलेल्या पावसाचे पाणी वाहून गेले अन् महिनाभरात उन्हाळ्यासारखे चित्र निर्माण झाले आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात रब्बी ज्वारीची पेरणी उशिराच सुरू होते. उशिरा सुरु होणार्या पेरणीने यावर्षी परतीचा पाऊस न पडल्याने म्हणावा तसा वेग घेतला नाही. अवघ्या ४४ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली असल्याचे कृषी खात्याकडून सांगण्यात आले. यावर्षी संपूर्ण क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता नाही. संपूर्ण पावसाळ्यात एकाच आठवड्यात काही भागात मोठय़ा प्रमाणावर पाऊस पडला. खरीप पेरणीवेळी व नंतर पाऊस न पडल्याने खरीप पिकांना पोषक वातावरण राहिले नाही. परतीचा पाऊस न पडल्याने रब्बी पेरणी व उगवणीवर परिणाम होणार आहे.
- एम. वाय.साठे, तालुका कृषी अधिकारी
अशी आहे स्थिती..
■ रब्बी पेरणी झालेले क्षेत्र- १७२.३१ हेक्टर
■ ज्वारी, मका, सूर्यफुल आदींचा समावेश
■ उत्तर तालुक्याचा सरासरी पाऊस- ५४२ मि.मी.
■ प्रत्यक्षात पडलेला पाऊस- ३८३ मि.मी.
■ मागील वर्षी पडलेला पाऊस- ५२८ मि.मी. पेरणीचे क्षेत्र कमी होतेय
■ ज्वारी, गहू, सोयाबीन, तूर, मूग, मटकी यासारखी पिके घेण्याकडे शेतकर्यांचा कल नाही. कमी पाण्यावर कमी दिवसात चार पैसे मिळतील अशी पिके घेण्याकडे शेतकर्यांचा कल आहे. यामुळेच रब्बीचे क्षेत्र कमी होत आहे. ज्वारीचे क्षेत्र कमी झाले असले तरी उशिरा गहू व हरभर्याची काही क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता आहे.