ट्रक पलटताच सोलापूरचे ट्रॅफिक पोलीस धावले तळपत्या उन्हात पाच तास जनतेसाठी ओझं वाहिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 12:06 PM2021-02-17T12:06:58+5:302021-02-17T12:07:47+5:30

महावीर चौकाजवळ ट्रकची बॉडी तुटली; सनमाईक रस्त्यावर पडले अन् वाहतूक थांबली

As soon as the truck overturned, the traffic police of Solapur rushed to the spot. | ट्रक पलटताच सोलापूरचे ट्रॅफिक पोलीस धावले तळपत्या उन्हात पाच तास जनतेसाठी ओझं वाहिले

ट्रक पलटताच सोलापूरचे ट्रॅफिक पोलीस धावले तळपत्या उन्हात पाच तास जनतेसाठी ओझं वाहिले

Next

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : वेळ दुपारी १ वाजताची...स्थळ-महावीर चौक... गुजरातहून तामिळनाडूकडे निघालेला मालट्रक सनमाईक भरून जात होता...अचानक गुरूनानक चौकाकडून महावीर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अचानक ट्रकची बॉडी तुटली...याचवेळी ट्रकची एकबाजू वाकून भरगच्च भरलेले सनमाईक रस्त्यावर पडले...याबाबतची माहिती मिळताच शेजारीच सिग्नलला थांबलेले वाहतूक पोलीस कर्मचारी धावले...अपघाताबाबतची माहीत घेत रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी तळपत्या उन्हात सोलापूरच्या त्या तीन ट्रॅफिक पोलिसांनी जनतेसाठी चार ते पाच तास ओझं वाहून रस्ता खुला केला.

दरम्यान, गुजरातहून तामिळनाडूकडे दहा ते बारा टन सनमाईक घेऊन निघालेली (टीएन ५२ एच. ६३५७) मालट्रक सोमवारी रात्रीच्या सुमारास सोलापुरात दाखल झाली होती. मात्र ट्रकमध्ये बिघाड झाल्याने तो रात्री सोलापूर शहरातच मुक्कामी होता. सकाळी ट्रक मेकॅनिककडून दुरुस्त करून तामिळनाडूकडे मार्गस्थ झाली. मार्केट यार्ड-अशोक चौक-७० फुट रोड-गुरूनानक चौकमार्गे विजापूररोडकडे जात असताना महावीर चौकाजवळ ट्रकचा पाटा तुटल्याने ट्रकची बॉडी अचानकपणे तुटली. याचवेळी गाडीत भरगच्च भरलेले सनमाईक रस्त्यावर पडले. या घटनेची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष काणे, सहायक पोलीस निरीक्षक संजीव भोसले, पोलीस उपनिरीक्षक अमित करपे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तातडीने रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वरिष्ठांचा आदेश मानत तत्काळ वाहतूक पोलीस कर्मचारी सचिन कुलकर्णी, अफरोझ मुलाणी व महिला वाहतूक पोलीस कर्मचारी शैलजा पोतदार यांनी आपल्या पदाचा गर्व न करता परराज्यातील वाहनधारकांना मदत करणे व सोलापुरातील जनतेची सेवा करून हा बंद मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी चक्क चार ते पाच तास तळपत्या उन्हात सनमाईकचं ओझं वाहून रस्त्याच्याकडेला ठेवलं. वाहतूक शाखेच्या या कामगिरीचे रस्त्याने ये जा करणाऱ्या वाहनधारकांनी कौतुक केलं.

२० लाखांच्या मालाचे नुकसान टळले

तामिळनाडूमधील वेसूर येथे सनमाईक घेऊन निघालेला ट्रक महावीर चौकाजवळ पाटा तुटल्याने बंद पडला. क्रेनने माल उचलत असताना त्या सनमाईकचे नुकसान होत होते. त्यामुळे हाताने रस्त्यावर पडलेला २० लाख रुपये किमतीचा माल वाहतूक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उचलून संकटात सापडलेल्या परराज्यांतील ट्रकचालकास दिलासा देण्याचे काम केले.

५ तास रस्ता केला होता बंद

ट्रकमधील सनमाईक बाजूला कलंडत असताना ट्रकचालक सर्वनाम टी याने वाहतूक पोलीस कर्मचारी शैलजा पोतदार यांना माहिती दिली. यावेळी तत्काळ पोलिसांनी क्रेनला मदतीसाठी पाचारण केले. कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी वाहनचालकाने बराच वेळ रस्त्याच्या कडेला उभे राहून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना सावध करण्याचे काम केले. वाहनधारकांना त्रास होऊ नये यासाठी पाच तास गुरुनानक चौकाकडून महावीर चौकाकडे येणारी एकेरी वाहतूक बंद ठेवली होती.

अल्ला आपका भला करे...

संकटात सापडलेल्या चालक सर्वनाम टी (रा. वैसूर राज्य-तामिळनाडू) यास वाहतूक पोलिसांनी धीर देण्याचा प्रयत्न केला, गाडीत असलेल्या मालाचे नुकसान होणार नाही याबाबतची ग्वाही दिली. कोणाचीही मदत न घेता खुद्द वाहतूक पोलिसांनीच रस्त्यावर पडलेला माल उचलून रस्त्याच्या कडेला नेला अन् वाहतूक सुरळीत करून दिली. हे सर्व पाहून ट्रकचालक सर्वनाम याने सोलापूर शहर वाहतूक पोलिसांचे कौतुक करीत अल्ला आपला भला करे...आपको लंबी उमर दे...अशी दुवा देत हात जोडून आभार मानत असल्याचे दिसून आले.

Web Title: As soon as the truck overturned, the traffic police of Solapur rushed to the spot.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.