हॅपी न्यूज ईयर; हॉटेल कामगार होणार सॉलिसिटर; सोलापूरच्या ताहेरचा थरारक प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 14:39 IST2019-01-01T14:35:10+5:302019-01-01T14:39:36+5:30
संजय द. शिंदे सोलापूर : तो पाच वर्षांचा असताना त्याच्या आईचे निधन झाले... वडील वीटभट्टीवर कामगार... घरची परिस्थिती अतिशय ...

हॅपी न्यूज ईयर; हॉटेल कामगार होणार सॉलिसिटर; सोलापूरच्या ताहेरचा थरारक प्रवास
संजय द. शिंदे
सोलापूर: तो पाच वर्षांचा असताना त्याच्या आईचे निधन झाले... वडील वीटभट्टीवर कामगार... घरची परिस्थिती अतिशय गरिबीची... शाळेला सुट्ट्या लागल्या की तो हॉटेलमध्ये, कँटिनमध्ये काम करायचा आणि पुढील शिक्षणासाठी पैसे जमवायचा... १२ वी नंतर बीएसएफमध्ये गेला. तेथून स्वेच्छानिवृत्ती घेऊन एलएलबी, एलएलएमसह अनेक पदव्या संपादन केल्या... आणि आज तो पुणे तसेच मुंबई हायकोर्टात वकिली करतोय... आणि स्वप्न आहे लंडनला जाऊन सॉलिसिटर (बॅरिस्टर) होण्याचे. ताहेरखाँ पठाण हे या जिद्दी व्यक्तिमत्त्वाचे नाव.
सोलापुरात होटगी रोडवरील सद्गुरु नगरमध्ये राहणाºया ताहेरला लहानपणापासूनच प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला. तो पाच वर्षांचा असतानाच त्याच्या आईचे निधन झाले. वडील वीटभट्टीवर मजुरी करायचे. अशा हलाखीच्या परिस्थितीत आपले शिक्षण आपणच काम करून पूर्ण करायचे असे ठरवून शाळेला सुट्ट्या लागल्या की तो लगेच हॉटेल, कँटिनमध्ये कामाला जायचा. या कामातून मिळालेल्या पैशांचा तो पुढील शिक्षणासाठी वापर करायचा.
सोलापुरातील शांतीनिकेतन हायस्कूलमधून त्याने दहावी उत्तीर्ण केली. सोशल कॉलेजमधून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर सीमा सुरक्षा दलात तो नोकरीला लागला. जम्मू-काश्मीर, मेघालय, त्रिपुरा, आसाम, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आदी ठिकाणी पोस्टिंग असतानाही त्याने शिक्षण सोडले नाही. शिवाजी विद्यापीठातून बहिस्थ विद्यार्थी म्हणून बी.ए., एम. ए. पूर्ण केले. १५ वर्षांनंतर स्वेच्छानिवृत्ती घेऊन एका कंपनीमध्ये वरिष्ठ सुरक्षा अधिकारी म्हणूनही त्याने काम केले. हे करीत असतानाच पुण्यात भारती विद्यापीठातून त्याने एमएसडब्ल्यू, टिळक विद्यापीठातून एलएलबी, पुणे विद्यापीठातून डिप्लोमा इन लेबर लॉ, डिप्लोमा इन सायबर लॉ, व्हीआयटी कॉलेजमधून एलएलएम अशा पदव्या संपादन केल्या.
आज तो क्रिमिनल लॉयर म्हणून पुण्यात शिवाजी नगर कोर्ट व मुंबईतील हायकोर्टात वकिली करतोय. युथ इंडिया फाउंडेशनचा कायदेविषयक सल्लागार म्हणूनही तो काम पाहतोय.
सॉलिसिटर होण्याचे स्वप्न
- सॉलिसिटर (बॅरिस्टर) होण्याचे ताहेरचे स्वप्न असून पुढील वर्षी लंडनला जाऊन तो ही पदवी संपादन करणार आहे आणि तसे त्याने नियोजनही केले अहे. ही एक वर्षाची पदवी असून पूर्वीच्या बॅरिस्टर या पदवीला आता सॉलिसिटर या नावाने ओळखले जाते.
दहा भाषा अवगत
- ताहेरला मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, पंजाबी, कन्नड, तेलुगू, बंगाली, भोजपुरी, ओरिया अशा दहा भाषा अवगत आहेत.
- राजस्थानमधील शेरपुरा बिकानेर या बॉर्डर पोस्टवर असताना पाकिस्तान सीमेवर झालेल्या एन्काऊंटरमध्ये त्याचाही सहभाग होता.