सोलापुरी शड्डू ; लोकवर्गणीतून बदलला पाणीवेस तालमीचा लूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 13:09 IST2018-11-24T13:08:21+5:302018-11-24T13:09:32+5:30
ऐतिहासिक आखाडा : १९३० च्या मार्शल लॉमध्ये तालमीतील कार्यकर्त्यांचा सहभाग

सोलापुरी शड्डू ; लोकवर्गणीतून बदलला पाणीवेस तालमीचा लूक
राजकुमार सारोळे
सोलापूर : स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे १९३० मध्ये आलेल्या मार्शल लॉ विरोधाच्या लढ्यात पाणीवेस तालमीच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता. सोलापूरच्या इतिहासाची साक्ष देणाºया या तालमीमधून अनेक नामवंत मल्ल घडले. दोनशे वर्षांपूर्वी या परिसरातील तरुण कार्यकर्त्यांनी स्थापन केलेली ही तालीम बारा बलुतेदारांचे आजही प्रतिनिधित्व करीत आहे.
पाणीवेस स्थापन करण्यामागे कृष्णात साठे यांनी पुढाकार घेतला होता. या परिसरात गिरणी कामगार मोठ्या प्रमाणावर राहत होते. यामध्ये गुरव, मराठा, लिंगायत, मुस्लीम अशा सर्व समाजातील लोकांचा रहिवास या परिसरात होता. पाणीवेस तालमीची स्थापना झाल्यावर सर्वसमावेशक तरुणांचा सहभाग वाढला. त्यामुळे या तालमीतून नामवंत कुस्तीपटू तयार झाले. इंग्रज सरकारने लादलेल्या मार्शल लॉ ला विरोध सुरू होता. या लढ्यात सोलापुरातील कोर्ट जाळण्यात आले होते. या प्रकरणात पाणीवेस तालमीचे कार्यकर्ते तोत्रा नारायण पवार यांचा सहभाग होता. हैदराबाद मुक्ती संग्रामातही पाणीवेसच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.
पाणीवेसमधून हिंद व महाराष्ट्र केसरी किताब मिळविणाºयांमध्ये दामोदर वानकर, रेवप्पा परळकर, अंबादास फुलारी, गंगाराम परळकर, पंढरीनाथ पवार, शंकर शिंदे, पंढरीनाथ फुलारी, विठ्ठल घाडगे, तानाजी अंजीखाने या पैलवानांचा समावेश आहे.
पाणीवेस तालमीने भूकंपग्रस्त, पूरग्रस्तांच्या मदतीसह अनेक सामाजिक कामे केली आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्यावर याची प्रेरणा घेऊन पाणीवेस परिसरातील तरुण कार्यकर्ते काशिनाथ वानकर, हरिबा परीट, तोत्रा नारायण पवार, शंकरराव शिंदे, लक्ष्मण शिंदे अशा कार्यकर्त्यांनी १९१६ मध्ये पाणीवेस गणेशोत्सवाची स्थापना केली.
तालमीचे काम दामोदर वानकर, दगडोबा घोडके, शिवा पवार, शिवशंकर झुंजे, बाबू फुलारी, लक्ष्मण शिंदे, बाबुराव शिंदे, महिबूब पठाण पैलवान अशा कार्यकर्त्यांनी पुढे सुरू ठेवले. त्यानंतर रामकृष्ण वानकर, अभिमन्यू शिंदे, किसन गवळी, नामदेवराव नलावडे, हरिभाऊ घोडके, विठ्ठल घाडगे, बाबासाहेब कणबसकर, संगमेश्वर झुंजे, तुकाराम गायकवाड, सूर्यभान काशिद, शिवाजी कोलते, लक्ष्मण गुळवे, प्रकाश झुंजे, गामा पैलवान यांनी स्वातंत्र्यानंतर तालीम व गणेशोत्सवाची परंपरा जपली. अलीकडच्या काळात लक्ष्मण नलावडे, भारत वानकर, सुभाष शिरसट, आदिनाथ बोरगावकर, तानाजी पवार, भारत गोले, मोरे बंधू, दत्तात्रय पैलवान, चन्नप्पा हरसुरे, बंडोबा पवार, संजय वानकर, कांबळे पेंटर, माजी नगरसेवक विठ्ठल ननवरे यांनी धुरा सांभाळली. आता तालमीचे नेतृत्व चंद्रकांत वानकर हे करीत आहेत, असे संचालक दत्तात्रय घाडगे यांनी सांगितले.
तालमीच्या दर्शनी भागात वाचनालय
च्स्थापनेवेळी तालमीच्या भिंती दगडी तर पत्र्याचे छत होते. १९८५ च्या दरम्यान दामोदरपंत वानकर यांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून पहिला मजला उभा केला. त्यानंतर पुढील पाच वर्षांत दुसरा मजला चढवून आधुनिकतेची कास धरत नवतरुणांसाठी जिमची व्यवस्था केली. . तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून पुढील भागात वाचनालय सुरू करण्यात आले.
तालीम म्हटले की, वस्ताद व पैलवानांची परंपरा डोळ्यांसमोर येते. पण आताचे तरुण तालमीमध्ये येण्यास तयार नाहीत. त्यामुळे जिमची व्यवस्था केली आहे. नवे कुस्तीपट्टू तयार व्हावेत या उद्देशाने पाणीवेस तालीम शिवजयंतीवेळी स्पर्धेचे आयोजन करीत आहे. तसेच आखाड्यातील स्पर्धांना सहकार्य करीत आहोत.
- चंद्रकांत वानकर
आधारस्तंभ, पाणीवेस तालीम