सोलापूर ऊस दर आंदोलन, चौथ्या दिवशीही सहकारमंत्र्यांचा साखर कारखाना बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 12:24 IST2017-11-20T12:24:21+5:302017-11-20T12:24:42+5:30
उसाला पहिली उचल तीन हजार रुपये मिळालीच पाहिजे, या मागणीसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मालकीचा असलेला लोकमंगल साखर कारखाना शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून बंद पाडला

सोलापूर ऊस दर आंदोलन, चौथ्या दिवशीही सहकारमंत्र्यांचा साखर कारखाना बंदच
आॅनलाइन लोकमत सोलापूर
मंद्रुप दि २० : उसाला पहिली उचल तीन हजार रुपये मिळालीच पाहिजे, या मागणीसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मालकीचा असलेला लोकमंगल साखर कारखाना शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून बंद पाडला. भंडारकवठे येथील लोकमंगल साखर कारखान्यासमोर बळीराजा, स्वाभिमानी, प्रहार व जनहित शेतकरी संघटनेने बेमुदत धरणे आंदोलनाचा यल्गार पुकारला आहे. याला तिसºया दिवशी वाढता प्रतिसाद मिळत असून, लोकमंगल कारखाना अजूनही बंदच आहे. सोमवारी साखर कारखान्यांवर पोलीसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता़ उपविभागीय पोलीस अधिकाºयांसह अन्य पोलीस अधिकारी कारखानास्थळावर बंदोबस्तात होते़
तिसºया दिवशी प्रदेशाध्यक्ष संजय पाटील-घाटणेकर, सोसायटीचे अध्यक्ष बापूराव पाटील, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष भागवत बिराजदार, उमाशंकर पाटील, भीमाशंकर बिराजदार, महादेव नागटिळक, दत्ता मस्के, सुरेश मस्के, माऊली जवळेकर, माऊली हळणवर, किसन घोडके, अख्तरताज पाटील, वसंत पाटील, आमसिद्ध बिराजदार, डॉ. शिवानंद झळके, रामचंद्र देशमुख, इरप्पा जावळे, सायप्पा कांबळे यांनी शुक्रवारपासून धरणे धरले आहे. रविवार हा आंदोलनाचा तिसरा दिवस होता. ऊस वाहतुकीच्या गाड्या अडविण्यात येत असून, सिद्धेश्वर, सिद्धनाथ, जकराया, जयहिंदसह अन्य साखर कारखान्याला जाणाºया उसाची वाहने शेतकरी संघटनेचे पदाधिकारी अडवित आहेत. बसवनगर चौकातही काही गाड्यांची हवा सोडण्यात आली तर मंद्रुप-निंबर्गी दरम्यान १५ ट्रॅक्टर मालकांनी स्वत:हून नुकसान टाळण्यासाठी लावले आहेत. आंदोलनाचा धसका घेत बैलगाडी ऊसतोड मजुरांनीही रविवारी तोड थांबवली. अनुचित प्रकार घडू नये, म्हणून मंद्रुप पोलीस ठाण्याचे सपोनि अजित त्रिपुटे यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
-----------------
राष्ट्रवादी, रासपाचा पाठिंबा
ऊसदरासाठी शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनात राष्ट्रवादी व रासपाने उडी घेतली आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ. बसवराज बगले व राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी आंदोलनात सहभाग घेत आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिल्याने आंदोलनाची धार आणखीनच वाढली आहे.