सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पेनुर येथे मोबाईल न दिल्याच्या रागातून एका १४ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही दुर्दैवी घटना रविवारी (१ मार्च २०२६) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यशराज धर्मराज डोके (वय १४) असे मृत मुलाचे नाव आहे. यशराजचे वडील शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. रविवारी संध्याकाळी यशराज आपल्या खोलीत होता. बराच वेळ झाला तरी तो खोलीचे दार उघडत नसल्याने घरच्यांना काळजी वाटू लागली. त्यांनी वारंवार हाका मारूनही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर लोखंडी रॉडच्या साहाय्याने दरवाजाची कडी तोडण्यात आली.
दरवाजा उघडताच समोरचे दृश्य पाहून कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली मोठा धक्का बसला. यशराजने घरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला साडीने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याला तातडीने खाली उतरवून पेनुर येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
याप्रकरणी यशराजच्या काकांनी पोलिसांना दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, यशराजला मोबाईलवर गेम खेळण्याची किंवा व्हिडिओ पाहण्याची आवड होती. रविवारी पालकांनी त्याला मोबाईल पाहण्यास मनाई केली, ज्यामुळे त्याला राग आला. याच रागाच्या भरात त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावा, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, मुलाच्या आत्महत्येमागे नक्की काय कारण होते, याचा शोध घेतला जात आहे.