रात्रीचं सोलापूर ; साखर झोपेतल्या स्मार्ट सिटीत गजबजला बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 01:05 PM2018-12-31T13:05:21+5:302018-12-31T13:08:37+5:30
पहाटे : 4:30 ते 5:00 पहाटेची चारची वेळ.. हुडीहुडी भरायला लावणारी थंडी.. पारा चक्क १०.४ अंशावर.. दुचाकीवर अॅक्सिलेटर फिरवतानाही ...
पहाटे : 4:30 ते 5:00
पहाटेची चारची वेळ.. हुडीहुडी भरायला लावणारी थंडी.. पारा चक्क १०.४ अंशावर.. दुचाकीवर अॅक्सिलेटर फिरवतानाही बोटे आखडतात की काय असं जाणवू लागलं. पुणे नाक्यावरुन संभाजी महाराजांच्या पुतळ्याला गिरकी घेऊन बसस्टँड गाठलं. इथं रिक्षाचालक अन् प्रवाशांची भाड्यासाठी घासाघिस पाहतच चौपाडमार्गे दत्त चौकात आलो. वर्तमानपत्राचे गठ्ठे मोजण्यात एजंट मंडळी गढून गेलेली. एखादंदुसरा पेपर विक्रेता येतोय. तसाच पुढे लक्ष्मी मंडईतल्या श्वानांचा केकटणारा आवाज ऐकत विजापूर वेस गाठली. स्टीटलाईटच्या लख्ख प्रकाशात स्टार बेकरी काय ती उघडी दिसली. बुधवार बाजार, जोडबसवण्णा चौक, अक्कलकोट रोड पाण्याची टाकीकडून डावीकडे वळण घेतलं अन् पुन्हा रविवार पेठ, भुलाभाई चौकातून मार्केट यार्ड गाठलं. तुरळक गर्दी जाणवत होती. मार्केट यार्डाच्या प्रवेशद्वाराला एकेक करीत वाहनांची रांग लागलेली. वॉचमन प्रत्येक वाहनांच्या नोंदी घेत वाहन सोडत होता. एव्हाना साडेचार वाजलेले. प्रवेशद्वार पार करताच समोरच फळांचे कॅरेट इकडून तिकडं करण्यात गढलेली व्यापारी, हमाल-तोलार मंडळी. कडाक्याच्या थंडीतही ओझं वाहणाºया मंडळीच्या कपाळावर घामाचे थेंब निथळत होते. तसाच पुढे पार झालो. वाहनांची अन् लोकांची एकच धांदल सुरु.. एकीकडं सारं शहर साखरझोपेत पहुडलेलं असताना इथं मात्र बाजार समिती नामक गावाची एकच धांदल दिसून आली. कोणालाही इथं रिकामा वेळ नाही. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त. खेडोपाड्यातून आलेले शेतकरी अन् दिवसभर भाजी मंडईत विक्री करणारी मंडळी भाजीपाला, फळफळावळ नेण्यासाठी आलेली. रोजच गजबजणाºया या गावात घडतं तरी काय, चलातर पाहू यात..!
रात्री ४.३५
साह्येब, फोटो नका काढू मी कायबी नाय केलं !
- बोचºया थंडीपासून वाचवण्यासाठी कानटोपी सावरत फिरताना अचानक तोंडाला काळा मास्क लावलेला तरुण समोर आला. त्या मास्कवर असलेलं चित्र विचित्र चित्र पाहून आम्ही थांबलो. आम्हाला पाहून तोही गडबडला. कॅमेरामॅननं फ्लॅश मारताच तो घाबरला. साह्येब, मी कायबी केलं नाही, फोटो कशाला काढताव. मी कुंभारीचाव. तोंडाला मास्कबद्दल तो म्हणाला ‘ थंडी लई वाजायल्याय म्हणून लावलंय’ आम्ही त्याच्या शंकेचं निरसन करीत पुढं निघालो; मात्र त्याचा तो मास्क जर अंधाºया रात्रीत एकट्यादुकट्यानं पाहिलं तर जाम घाबरल्याशिवाय मात्र राहणार नाही हे खरं.
इथं रोजच हजारोंनी भरते बळीराजाची जत्रा..
- साडेचारच्या सुमाराला सौदे सुरु झाले. जिवापाड जोपासलेल्या मालाला चांंगला भाव मिळावा यासाठी शेतकºयांची धडपड तर ठोक मार्जिन किती मिळेल याची गणितं मांडणाºया व्यापाºयांचा आटापिटा इथं प्रामुख्यानं दिसला.
- जिकडं पाहावं तिकडं माणसांची जत्रा भरल्याचं दिसलं. या कोलाहालात धड नीटसं ऐकूही येत नव्हतं. मोबाईलवर ‘व्हयरं हणम्या कुटाय तू, सौदा सुरु झाला की लका, हितं सन हॉटेलसमोर ये! कांद्याचा सेल हाय बग तितं मी उभारलोय’ मोठमोठ्यानं बोलणारी मंडळीही इथं दिसली.
- मनमोहक सुगंध दरवळणाºया जाई,जुईबरोबरच लालचुटूक, गुलाबी गुलाब, पिवळा, केसरी उठून दिसणारा झेंडू, घेवडा, आष्टर रंगीबिरंगी फुलानं भरलेला बाजारही पहाटेच्या प्रहरी मोहक भासत होता. इथंही शेतकरी-व्यापारी, फुलाºयांची दरासंबंधी चालणारी घासाघिस अन् एकदाचा समेट होऊन खरेदी-विक्रीचं दृश पाहावयाला मिळालं.
नमाजाच्या अजाननंतर सौद्याची धांदल
- साधारण सव्वापाच वाजलेले.. मशिदीतून ध्वनिक्षेपकाद्वारे अजानचा आवाज सुरु झाला अन् अडतीवर आजूबाजूला पांघरुन बसलेले खेडोपाड्यातील शेतकºयांची एकच धांदल सुरु झाली. ए हणम्या उठ लंका.. आता सौदे सुरु व्हत्याल. कुणी आळोखे पिळखो देत, जांभळ्या देत एकमेकाला उठवत होता. याबद्दल शेतकºयांना विचारलं तेव्हा ते म्हणाले ‘ अवो नमाज झाली की सौदे सुरु व्हत्यात. चला जाऊ द्या तुमच्याशी काय बोलून राहिलोय’ म्हणतच तोंड धुण्यासाठी निघाले.
लालचुटूक डाळिंबाचं विलोभनीय दर्शन
- फळफळावळाच्या बाजारात चक्कर मारताना शेकडो कॅरेटमध्ये भरलेले डाळिंब पिवळ्या धमक लाईटच्या प्रकाशात लक्ष वेधून घेतले. व्यापारी, शेतकरी, सौद्यासाठी कॅरेट व्यवस्थित ठेवत होते. काही वेळानं सौद्याला सुरुवात होणार असल्यानं ते आपापल्या कामात व्यस्त दिसले. आमच्या फोटोग्राफरनं फ्लॅश मारल्याचंही त्यांना कळलं नाही.
नवरदेवाची कार बाजारात
- विवाहसोहळा, कार्यक्रम असला की, जेवणावळीसाठी थेट मार्केट यार्ड गाठलं जातं. अशाच एका विवाहकार्यासाठी नवरदेवासाठी सजवलेली कार भाजीपाला आणण्यासाठी चक्क सजवलेल्या स्थितीत मार्केट यार्डात आली होती. बहुधा परगावची असावी. त्यांनी सर्व माल गाडीत टाकला अन् थेट रोड गाठला.
शेकोटीचा जाळ अन् धूर
- सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोपºयातून आपला माल अडतीवर विकण्यासाठी शेतकरी आलेले..रात्रभर शाल, रग पांघरुन उजाडण्याची वाट पाहत होते. अंगाला झोंबणारा गार वारा अन् थंडीपासून वाचवण्यासाठी शेकोटी घेत होते. जो तो आपल्या मालाला चांगला भाव कसा येईल अशा काहीबाही गप्पा मारताना दिसले. मध्येच कुणीतरी फुंकर मारत होता. यामुळं धुराच्या लोटानं ठसका घेत चला रं बाबा अडतीकडं म्हणून परतत होते.
बटाटे वाहणाºया ‘चंबल की राणीचा’ असाही थाट
- हौसेला मोल नाही म्हणतात ते अगदी खरंय. थेट राजस्थानहून बटाट्याचा माल घेऊन एक मालट्रक यार्डात दिसली. तिच्या चहुबाजूने लिहिलेला मजकूर लक्ष वेधून घेत होता. एखादा नमुना पहा त्यावरचा मजकूर सांगतो. ‘पिया घर कब आओगे, जय माँ रैहनावाली.चंबल की राणी, ढोलपूर, पप्पूभाई, जय जवान, जय किसान. शौकिन मालकाच्या या गाडीकडं येणारा-जाणारा क्षणभर तरी थांबून पाहत होता.