सोलापूर महानगरपालिकेत काँग्रेसच्या सत्ताकेंद्राला सामाजिक वीण...!
By Admin | Updated: January 24, 2017 20:12 IST2017-01-24T20:12:51+5:302017-01-24T20:12:51+5:30
सोलापूर महानगरपालिकेत काँग्रेसच्या सत्ताकेंद्राला सामाजिक वीण...!

सोलापूर महानगरपालिकेत काँग्रेसच्या सत्ताकेंद्राला सामाजिक वीण...!
सोलापूर महानगरपालिकेत काँग्रेसच्या सत्ताकेंद्राला सामाजिक वीण...!
शंकर जाधव - सोलापूर
राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर अशा महापालिकांच्या पाठोपाठ सोलापूर महापालिका १ मे १९६४ रोजी अस्तित्वात आलेली आहे. या महापालिकांच्या आणि महापालिका क्षेत्रातील राजकारणाच्या उलथापालथी झाल्या. त्या तुलनेत सोलापूर महापालिकेच्या राजकीय सत्तास्थानाचा लंबक मात्र १९८५ ते १९८७ या कालावधीतील पुलोद आघाडीचा अपवाद वगळता नेहमीच काँग्रेसच्या बाजूने झुकलेला आहे. काँग्रेसच्या सत्ताकेंद्राचे बळ इथल्या सामाजिक वीणेमध्येच आणि काँग्रेसच्या नेतृत्वाने जाणीवपूर्वक गुंफलेल्या ‘सोशल इंजिनिअरिंग’ मध्येच आहे.
राजकीय सत्ताकेंद्र हे एका वर्गाकडून दुसऱ्या वर्गाकडे झुकत असते. सत्ताधारी राजकीय पक्ष ज्यावर्गाचे हितसंबंध जपतो, त्याच्याविरुद्ध इतर वर्ग प्रतिस्पर्धी राजकीय पक्षाशी सलगी करतो. महाराष्ट्राच्या विशेषत: मुंबईच्या नागरी राजकारणात शिवसेनेने समाजातील ओबीसी वर्गाला संघटित करून सत्ताधारी शिक्षित व मध्यमवर्गीय हितसंबंध जोपासणाऱ्या काँग्रेसला भक्कम पर्याय दिला. तसा सोलापुरात सत्ताधारी काँग्रेस वर्गाशी भक्कम राजकीय संघर्ष उभा करता आला नाही. या राजकीय संघर्षाची वीण इथल्या सामाजिक वीणेशी जोडलेली आहे.
काँग्रेस पक्ष व काँग्रेसच्या विचारधारेला जोडलेला वर्ग इथे मोठा आहे. वीरशैव लिंगायत समाजाची लोकसंख्या सुमारे दीड लाखाच्या आसपास आहे. सर्वाधिक एकगठ्ठा लोकसंख्या पद्मशाली व साळी समाजाची आहे. साधारण लोकसंख्या अडीच लाख ते तीन लाखांच्या आसपास आहे. हा वर्ग मूळत: हस्तकौशल्यावर उपजीविका साधणारा आहे. हातमाग, वीणकाम, यंत्रमाग, विडी अशा उद्योगातील मजूर हा वर्ग आहे. या वर्गावर कम्युनिस्ट वर्गाचा प्रभाव आहे. परंतु या वर्गातील आर्थिक आघाडीवर असलेला कारखानदार काँग्रेसच्या पाठीशी राहिलेला आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या सुमारे एक ते दीड लाख इतकी आहे. या वर्गातील नवशिक्षित वर्ग सुमारे ५० हजारांवर आहे. काँग्रेसच्या आरक्षण तत्त्वाच्या हितसंबंधामुळे बहुतांश वर्ग काँग्रेसच्या पाठीशी राहिलेला आहे. आंबेडकरी विचारधारेवर आधारित राजकीय पक्षांमधील राजकीय गटाचा फायदा काँग्रेसलाच होत राहिला आहे. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाची शकले उडाल्याने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता विखुरलेला आहे,
अल्पसंख्याक वर्गाची संख्या सुमारे दोन लाखांच्या आसपास आहे. काँग्रेस व अल्पसंख्याक हिताच्या राजकारणाची वीण ही स्वातंत्र्यपूर्व काळापासून जोडलेली आहे. त्यामुळे अल्पसंख्याक वर्गही अनेकदा काँग्रेसच्या पाठीशी राहिला आहे. अलीकडील काळात एमआयएमने डोके वर काढल्याने अल्पसंख्याक वर्ग काहीअंशी या पक्षाकडे झुकला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत याची प्रचिती आली आहे.
डाव्या चळवळीचे अल्पसंख्याकात असलेले अस्तित्व वगळता अल्पसंख्याक वर्गावर राजकीय प्रभाव असलेला समाजवादी पक्ष प्रभावी नसल्याने काँग्रेसच्या पथ्यावर हे राजकीय वातावरण पडते आहे.
शेतकरी संस्कृतीशी नाळ असलेला मराठा, ओबीसी वर्गाचा काँग्रेसशी संघर्ष आहे. यातील बहुतांश वर्ग राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडलेला आहे. परंतु काँग्रेसची नाळ जोडलेल्या इतर वर्गाची नैसर्गिक नाळ तोडण्यात राष्ट्रवादीला अजून यश आलेले नाही. अल्पसंख्याक वर्गात सध्या राष्ट्रवादीने अलीकडे प्रभाव टाकण्याचा प्रयत्न सुरु केला आहे, परंतु सत्तासंघर्ष उभा करण्यात राष्ट्रवादीला तितकेसे यश आलेले नाही. ‘निवडणुकीत कुस्ती आणि नंतर दोस्ती’ हे सूत्र आजवर राष्ट्रवादी काँग्रेसने अवलंबल्याने काँग्रेसचे बोट धरण्याशिवाय राष्ट्रवादीपुढे कुठलाच पर्याय नाही. त्यातच नेते जास्त आणि कार्यकर्ते कमी तसेच गटबाजीने हा पक्षा पुरता पोखरलेला आहे. हा पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरला तर सर्व ठिकाणी उमेदवार देण्यात या पक्षाची अजिबात ताकद नाही.
गेल्या कित्येक वर्षांपासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे सोलापूरच्या नागरी राजकारणावर प्रभाव टाकून आहेत. सुशीलकुमार शिंदे यांचे कनिष्ठ वर्गातील प्रतिनिधीत्वही काँग्रेसच्या सत्ताकेंद्राशी जोडलेले आहे. समाजातील आर्थिक, शैक्षणिक, सामाजिकदृष्ट्या कनिष्ठ असलेल्या वर्गाचे संख्याबळ मोठे आहे. या सर्व वर्गावर काँग्रेस पक्ष प्रभाव टाकून आहे. निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या कौशल्यात काँग्रेस सर्व राजकीय पक्षाहून बलशाली आहे.
------------------
राज्यात व केंद्रात काँग्रेसचे असलेले वर्चस्व व सामाजिक वीणेमुळे महापालिकेच्या राजकारणात काँग्रेस नेहमीच केंद्रस्थानी राहिला आहे. महापालिकेच्या राजकारणात काँग्रेसच्या पाठीशी असलेले एकूण बळ इतर सर्व पक्षांच्या तुलनेइतकेच आहे. सर्वाधिक बळ काँग्रेसला लाभत असल्यानेच महापालिका राजसत्तेत काँग्रेस राज्य करत आहे. आता ही राजसत्ता टिकविण्याची आणि त्यांच्याकडील सोशल इंजिनिअरिंगचा योग्य पद्धतीने वापर करण्याचे कौशल्य काँग्रेसच्या नेत्यांना दाखवावे लागणार आहे.
-----------------
स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात नगरपालिकेवर फडकविण्यात आलेला तिरंगा, मार्शल लॉ प्रकरण, त्यानंतर चार हुतात्म्यांना फाशी या सर्व घटना शहराच्या क्रांतिकारी संस्कृतीची वीण अधिकाधिक घट्ट करणाऱ्या ठरल्या आहेत. ब्रिटिशकाळात इथल्या नागरीकरणाला गती आली. चार क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य लढ्यात घेतलेल्या उडीची प्रेरणा महात्मा गांधीजी यांची होती. या सर्व स्वातंत्र्यपूर्व काँग्रेस राजकारणाचा प्रभाव इथल्या नागरी राजकारणावर राहिला आहे. पण याचा योग्य वापर करण्यात काँग्रेस मागे पडत आहे. हा मागासलेपण या महापालिका निवडणुकीत काँग्रेसला महागात पडू नये, म्हणजे झाले.
-----------------------
निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या कौशल्यात काँग्रेस सर्व राजकीय पक्षाहून बलशाली आहे; मात्र सद्यस्थितीत केंद्रातील आणि राज्यातील भाजपचे सरकार असल्याचे स्थानिक पातळीवर भाजपला महापालिकेतही सत्तेची स्वप्ने पडू लागली आहेत. मोदी सरकारचे निर्णय आणि देवेंद्र फडणवीस यांचा आक्रमकपणा आणि स्वच्छ प्रतिमा ही भाजपची जमेची बाजू आहे. या जोरावरच भाजपने महापालिका निवडणुकीत मुसंडी मारण्याचा निर्धार केला आहे. काँग्रेस पक्षातील स्थानिक पातळीवर गटबाजी ही या पक्षाला डोकेदुखी आहे. स्थानिक नेत्यापेक्षा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आ. प्रणिती शिंदे यांनी योग्य पद्धतीने महापालिका निवडणुकीची सूत्रे हलवली तरच काँग्रेसचा या निवडणुकीत निभाव लागणार आहे.