सोलापूरला महापुराचा वेढा; एअरलिफ्टिंग अन् एनडीआरएफव्दारे नागरिकांचे स्थलांतर
By आप्पासाहेब पाटील | Updated: September 23, 2025 12:53 IST2025-09-23T12:52:58+5:302025-09-23T12:53:29+5:30
लवकरच आर्मीचे हेलिकॉप्टर पथक दारफळ येथे पोहोचून सर्व नागरिकांना बाहेर काढण्याची कार्यवाही करतील. महाराष्ट्र राज्य नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून एनडीआरएफचे आणखी एक पथक बचाव कार्यासाठी येणार असल्याचेही सांगण्यात आले.

सोलापूरला महापुराचा वेढा; एअरलिफ्टिंग अन् एनडीआरएफव्दारे नागरिकांचे स्थलांतर
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस व अतिवृष्टी होत आहे. तसेच उजनी धरणातून भीमा नदीत तसेच सीना कोळेगाव प्रकल्पातून सीना नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडला जात असल्याने माढा, करमाळा, मोहोळ, पंढरपूर, उत्तर सोलापूर या तालुक्यातील अनेक गावे पुराच्या पाण्यात अडकलेली आहेत.
जिल्ह्यातील सहा तालुक्यात निर्माण झालेल्या पुराची परिस्थिती पाहता अतिरिक्त बचाव पथके आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी रात्रीपासून अन्य जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून अकरा बोटी पुरेशा मनुष्यबळासह उपलब्ध करून घेतल्या असून त्या आज दुपारपर्यंत घटनास्थळी दाखल होऊन बचाव कार्याला अधिक गती मिळणार आहे. यामध्ये कोल्हापुर ३, लातूर १, सांगली ३, इंदापूर २, नांदेड २ अशा ११ कोटी मागवण्यात आलेल्या आहेत.
त्याप्रमाणेच माढा तालुक्यातील दारफळ येथे पुराच्या पाण्यात अनेक नागरिक अडकले असून एनडीआरएफ टीमचे पथक बचावासाठी गेले होते परंतु पुराच्या पाण्याचा प्रवाह खूप गतीने येत असल्याने त्यांना त्या नागरिकांना सुखरूप ठिकाणी बाहेर काढणे शक्य झालेले नव्हते त्यामुळे सैन्य दलाची चर्चा करून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी त्या नागरिकांना एअरलिफ्टद्वारे सुखरूप ठिकाणी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले आहेत. लवकरच आर्मीचे हेलिकॉप्टर पथक दारफळ येथे पोहोचून सर्व नागरिकांना बाहेर काढण्याची कार्यवाही करतील. महाराष्ट्र राज्य नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून एनडीआरएफचे आणखी एक पथक बचाव कार्यासाठी येणार असल्याचेही सांगण्यात आले.
महापुराची परिस्थिती हाताळण्यासाठी रात्रंदिवस अधिकाऱ्यांचे परिश्रम
संपूर्ण सोलापूर जिल्हा प्रशासन तसेच तालुकास्तरीय प्रशासकीय यंत्रणा ही महापूराची परिस्थिती हाताळण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत. तरी नागरिकांनी जिल्हा नियंत्रण कक्षाच्या 0217/2731012 या क्रमांक वर संपर्क साधून अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या अनुषंगाने माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत.