ठार झालेला बिबट्या होता पूर्ण वाढ झालेला नर; नरभक्षक का झाला य़ाचा शोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 13:20 IST2020-12-19T13:19:57+5:302020-12-19T13:20:03+5:30
करमाळ्यातील बिटरगाव-वांगी परिसरात बिबट्याला ठार करण्यात आले

ठार झालेला बिबट्या होता पूर्ण वाढ झालेला नर; नरभक्षक का झाला य़ाचा शोध सुरू
सोलापूर : करमाळ्यातील बिटरगाव-वांगी परिसरात बिबट्याला ठार करण्यात आले. तीन बाजूला पाणी आणि एका बाजूला शूटर थांबवून बिबट्याची कोंडी करण्यात आली. त्यामुळे बिबट्याला दुसरीकडे जाणे शक्य नव्हते. या परिस्थितीत शूटरने बिबट्याला ठार केले, अशी माहिती उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दिली.
ठार झालेला बिबट्या होता पूर्ण वाढ झालेला नर
ठार करण्यात आलेला बिबट्या हा नर होता. त्याची पूर्ण वाढ झालेली असून, वय अंदाजे सहा ते सात वर्षे इतके होते. त्याची शेपटीसह लांबीही सहा फूट इतकी होती. बिबट्याविषयी खूप अफवा पसरल्या आहेत. तीन डिसेंबरपासून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत होते. ज्या परिसरात त्याला ठार केले त्याच परिसरात त्याने काही दिवसांपूर्वी हल्ला केला होता. त्याच्याविषयीच्या माहितीचे अॅनालिसिस करण्यात आले. त्याच्या पायांच्या ठशांमुळे (पगमार्क) नरभक्षक असलेला बिबट्या हा तोच असल्याचे सिद्ध झाले. रोज सरासरी आठ किलोमीटर तो प्रवास करत होता. सोलापुरातील केळी व उसाच्या शेतात आल्यावर तो घुटमळला, त्यामुळे तो फक्त एक ते दीड किलोमीटर फिरत होता.
नरभक्षक का झाला य़ाचा शोध....
बिबट्या सहसा माणसावर हल्ला करत नाही. मग तो नरभक्षक का झाला होता, याचा शोध हा त्याच्या जबड्याच्या अभ्यासातून करण्यात येणार आहे. जबड्यात दुखावला होता का दात तुटले होते, हे पाहण्यात येणार आहे. माणूस हा सहज सावज असल्याने तो हल्ला करत होता. शवविच्छेदन अहवालानंतर या बाबी स्पष्ट होतील.