युन्नूसच्या अवयवदानाने वाचवले सहा जणांचे प्राण, सोलापुरात ११ वा ग्रीन कॅरीडॉर यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 02:22 PM2018-08-23T14:22:26+5:302018-08-23T14:27:16+5:30

चोख पोलीस बंदोबस्त : सोलापुरात ११ वा ग्रीन कॅरीडॉर, अश्विनी रुग्णालयात पार पडली मोहीम

Six organisms survived by Yunnus' organ, 11th Green Corridor succeeded in Solapur | युन्नूसच्या अवयवदानाने वाचवले सहा जणांचे प्राण, सोलापुरात ११ वा ग्रीन कॅरीडॉर यशस्वी

युन्नूसच्या अवयवदानाने वाचवले सहा जणांचे प्राण, सोलापुरात ११ वा ग्रीन कॅरीडॉर यशस्वी

Next
ठळक मुद्देमुस्लीम समाजातील  तरुणाचे अवयदानअवयदानाने सामाजिक सलोख्याचा फार मोठा संदेश सोलापुरात ही ११ वी ग्रीन कॅरीडॉर मोहीम ठरली

सोलापूर : रक्ताला अन् अवयवाला जात धर्म व पंथ नसतो असे म्हणतात ते काही खोेटे नाही. मुस्लीम समजाचा बकरीद सण सुरू असताना त्याच दिवशी  मुस्लीम समाजातील  तरुणाचे अवयदान केल्याने सहाजणांचे प्राण वाचले असून त्यात एका हिंदू महिलेचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. ज्याला अवयदान केले त्याचे नाव गुप्त ठेवले जाते.  या अवयदानाने सामाजिक सलोख्याचा फार मोठा संदेश आज जगाला दिला आहे. 

सोलापुरातील अश्विनी सहकारी रुग्णालयातून पोलीस बंदोबस्तात ग्रीन कॅरीडॉर मोहीम पार पडली. यामध्ये ब्रेनडेड रुग्ण युन्नूस सत्तार शेख (वय ३७, रा. नळदुर्ग, जि. उस्मानाबाद) या रुग्णाचे यकृत (लिव्हर), स्वादूपिंड (पॅनक्रियास), २ मूत्रपिंड आणि दोन डोळे अशा सहा अवयवांचे दान करण्यात आले. सोलापुरात ही ११ वी ग्रीन कॅरीडॉर मोहीम ठरली. 

ब्रेनडेड रुग्ण युन्नूस शेख रविवारी १९ आॅगस्ट रोजी तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथे अपघातात गंभीर जखमी झाला होता. युनुस हे उस्मानाबाद जि. प. मध्ये लिपिक होते.  त्यांच्यावर उपचार करण्यासाठी प्रसन्न कासेगावकर यांच्या रुग्णालयात दाखल केले होते. तेथून मंगळवारी अश्विनी रुग्णालयात दाखल केले.  तपासाअंती युन्नूसच्या डोक्यास गंभीर इजा झाल्याने डॉ. सिद्धेश्वर रुद्राक्षी, डॉ. प्रीतेश अग्रवाल, डॉ. शंतनू गुंजोटीकर यांनी त्याच्या विविध तपासण्या केल्या. अनेक चाचण्यानंतर २१ आॅगस्ट रोजी रात्री त्याला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. 

त्यानंतर रुग्णाची पत्नी, मुले आणि नातलगांशी समुपदेशक स्वरुपा कवलगी यांनी चर्चा करुन अवयवदानासाठी प्रवृत्त केले. मेंदूमृत असला तरी त्यांच्या इतर अवयवांमुळे गरजू रुग्णास जीवदान मिळेल, असे समजावून सांगितले. नातलगांनी दु:खावेग बाजूला ठेवून अवयवदानास तयारी दर्शविली. संबंधित समितीच्या निर्णयानंतर अवयवदान मोहीम पार पडली. यातील लिव्हर पुण्याच्या ससून हॉस्पिटल तर १ किडनी व स्वादूपिंड पुण्याच्याच सह्याद्री हॉस्पिटलमधील गरजू रुग्णास ग्रीन कॅरीडॉर निर्माण करुन प्रत्यारोपणासाठी पाठवण्यात आले.

दुसरी किडनी अश्विनी रुग्णालयातील गरजू रुग्णास देण्यात आली. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातील रुग्णासाठी दोन  डोळे दान करण्यात आले.  पैगंबरवासी युन्नूस शेख यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुले, चुलत भाऊ असा परिवार आहे. 
या अवयवदान प्रक्रियेत अश्विनी रुग्णालयाचे प्रेसिडेंट बिपीनभाई पटेल, चेअरमन चंद्रशेखर स्वामी, व्हाईस चेअरमन विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रसन्न कासेगावकर, डॉ. संदीप पाटील, डॉ. पल्लवी मेहता, डॉ. प्रियंका करडे यांनी यशस्वी प्रयत्न केले. अवयव काढण्याच्या मोहिमेत डॉ. विठ्ठल कृष्णा, डॉ. हेमंत देशपांडे, डॉ. किरण जोशी, डॉ. संदीप होळकर, डॉ. संजय गायकवाड, डॉ. विद्यानंद चव्हाण, डॉ. वैशाली दबडे, डॉ. अनुराधा कारंडे, डॉ. संतोष कलशेट्टी, डॉ. अरुणकुमार यांचा सक्रिय सहभाग होता. पुण्याच्या ससून व सह्याद्री हॉस्पिटल येथून डॉ.कमलेश बोकील, डॉ. संतोष थोरात, डॉ. अभिजित माने, डॉ. सेनथिल यांच्यासह सहकारी डॉक्टरांच्या वैद्यकीय पथकांचा ग्रीन कॅरीडॉर मोहिमेत सहभाग होता. प्रशासनातील डॉ. राजेंद्र घुली, डॉ. सत्येश्वर पाटील, म. सलीम सय्यद, दत्ता शिगेद, स्वप्निल लांबतुरे, अवधूत कुलकर्णी, सूर्यकांत कवलगी, शिवराम सरवदे, स्वप्निल घोडके, उमेश शिवशरण यांनी परिश्रम घेतले.

अवयवदानात सोलापूर अग्रेसर
- सोलापुरात यापूर्वी अश्विनी सहकारी रुग्णालय, अश्विनी ग्रामीण रुग्णालय, कुंभारी येथून उस्मानाबादच्या पार्थ कोळी यांच्यासह अन्य दोघे, शासकीय रुग्णालयात बसवकल्याण येथील ओंकार अशोक महिंद्रकर, यशोधरा हॉस्पिटलमध्ये सविता डिकरे, कालिका महामुनी, चंद्रकांत घोळसगावकर, प्रकाश भागवत, सतीश पलगंटी, कृष्णाहरी बोम्मा आणि आता रवींद्र शिंगाडे, अश्विनी रुग्णालयात सुनील क्षीरसागर यांना आज (बुधवारी) युन्नूस शेख अशी अवयवदान केलेल्यांची नावे आहेत. सोलापुरात ही ११ वी ग्रीन कॅरीडॉर मोहीम राबवून सोलापूर अवयवदान मोहिमेत आघाडीवर राहिला आहे. 

Web Title: Six organisms survived by Yunnus' organ, 11th Green Corridor succeeded in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.