भारत माता नगरातील सहा घरांना लागली आग; संसारोपयोगी साहित्य जळून खाक
By Appasaheb.patil | Updated: June 6, 2023 16:00 IST2023-06-06T16:00:23+5:302023-06-06T16:00:34+5:30
संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली.

भारत माता नगरातील सहा घरांना लागली आग; संसारोपयोगी साहित्य जळून खाक
सोलापूर - शहरातील कुमठा नाका परिसरातील भारत माता नगर, लिप्रेसी कॉलनी भागातील सहा घरांना मंगळवारी अचानक आग लागली. या आगीत घरगुती, संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली.
सोलापूर शहरात भारतमाता नगर आहे. या नगरात पत्राशेडमध्ये राहणारे अनेक कुटुंब आहेत. दरम्यान, मंगळवारी पहाटे २ वाजून ४८ मिनिटांनी आगीची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच सोलापूर महानगरपालिका अग्निशामक दलाच्या सहा गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या. वारे जोरात वाहू लागल्याने आग मोठया प्रमाणात भडकू लागली होती.
मात्र अग्निशामक दलाच्या जवानांनी जिवाचं रान करून अवघ्या अर्धा तासात आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेत भारत माता नगरातील सायराबानो तनुजा चोपदार, तनोजा जाकीर फकीर पीर, रोशन रोहित बोराडे याच्या घरात राहणारे भाडेकरू रेणुका अशोक अडगळे, लक्ष्मण सिद्राम बोराडे याच्या घरात राहणारे भाडेकरू बशीर तेलंगी याशिवाय अल्ताफ बागवान, आफ्रीन ईस्माईल शेख यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य, पंखे, फ्रीज, कुलर, भांडी आदी विविध घरगुती साहित्य जळून खाक झाले आहे.