The situation is out of control .. Save Solapur now! | परिस्थिती हाताबाहेर गेलीय.. सोलापूरला आता वाचवा !

परिस्थिती हाताबाहेर गेलीय.. सोलापूरला आता वाचवा !

ठळक मुद्देखाजगी रुग्णालय सुरू करायला भाग पाडासोलापूरचे गोरगरीब रुग्ण तुम्हाला दुवा देतीलसर्व उपाय आता खुंटले आहेत काळजी घ्या

सोलापूर: कोरोनाच्या संकटांनं सारेच हतबल झाले आहेत.  परीस्थिती हाताबाहेर जात आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सिव्हीलचे सर्वच बेड हाऊसफुल्ल झाले आहेत. सोलापूरला वाचवा असा आर्त टाहो सिव्हील प्रशासनाकडून फोडला जात आहे.


 या संदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉ. औदुंबर मस्के यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे की, गुरुवारी रात्री पर्यंत आयसोलेशन वार्डमध्ये २३ सिरीयस रुग्ण होते. रात्री ११ च्या दरम्यान अजून २ सिरीयस रुग्णांना अ‍ॅडमिट करावे लागले. आमची २५ बेडची आय. सी. यु फुल्ल झाली आहे. सिरीयस रुग्णांना अ‍ॅडमिट करून घेण्याची सिव्हिल हॉस्पिटलची क्षमता संपली आहे. रात्रीतून कोणी गोरगरीब रुग्ण आला तर कुठे ठेवायचे हा यक्ष प्रश्न आमच्यासमोर पडला आहे.


इतरवेळी ओढाचढीने रुग्णांना अ‍ॅडमिट करणार्‍या खाजगी रुग्णालयांनी या भीषण संकटात रुग्णालयाचे दरवाजे बंद ठेवले आहेत.  पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आयुक्त, उपायुक्त सर्व प्रकारे प्रयत्न करीत आहेत पण खाजगी रुग्णालये दाद देईनात. रात्रीच उपायुक्तांना फोन करून सांगितले आहे. उपायुक्तांनी तात्काळ चौकशी करून सांगतो असे सांगितले आहे.


 पण मला वाटत नाही की खाजगी रुग्णालये प्रतिसाद देतील म्हणून... बंधूंनो, न जाणो आपल्यापैकी कुणाच्या जवळच्या व्यक्तीला आज आय. सी. यु. उपचाराची गरज भासली तर काय करायच ?


खरंच... आजपर्यंतच्या वैद्यकीय क्षेत्रातील आयुष्यात एवढी हतबलता कधीच आली नव्हती.. पत्रकार बांधवांनो, सर्व काही आता तुमच्याच हातात आहे.
मी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करतो की गोरगरीब रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी काही तरी करा. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची ताकद काय असते हे दाखवून द्यायची यापेक्षा दुसरी कुठलीच संधी मिळणार नाही.


खाजगी रुग्णालये उघडायला भाग पाडा.. सर्व उपाय खुंटले आहेत. फक्त आणि फक्त तुमच्यावरच आता भरोसा आहे. सोलापूरचे गोरगरीब रुग्ण तुम्हाला आयुष्यभर दुवा देतील.  खूप भयानक स्थिती उदभवण्याची चिन्हे आहे, अशी आगतिकता अधीक्षक डॉ. मस्के यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: The situation is out of control .. Save Solapur now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.