सोलापुरात शिवजयंती साध्या पध्दतीने; सार्वजनिक ठिकाणी मूर्ती प्रतिष्ठापना नाही; रॅली, मिरवणुकांना बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 16:30 IST2021-02-18T16:30:11+5:302021-02-18T16:30:36+5:30
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आदेश

सोलापुरात शिवजयंती साध्या पध्दतीने; सार्वजनिक ठिकाणी मूर्ती प्रतिष्ठापना नाही; रॅली, मिरवणुकांना बंदी
सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करा, असे आवाहन करत जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी शिवमूर्ती अन् प्रतिमा प्रतिष्ठापनेला परवानगी नाकारली आहे. दहा लोकांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करावी तसेच यावेळी मास्क आणि सॅनिटायझर बंधनकारक आहे. रॅली-मिरवणुका तसेच अन्य सार्वजनिक कार्यक्रमांना प्रशासनाकडून परवानगी दिली जाणार नाही, असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बुधवारी दिले आहेत.
शुक्रवार, १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती आहे. यादिवशी मोठ्या संख्येने शिवभक्त एकत्र येऊन मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करतात. त्यामुळे गर्दीतून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल, अशी भीती प्रशासनाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाने शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शंभरकर यांनी बुधवारी स्वतंत्र आदेश काढून शिवजयंतीबाबत नियमावली जाहीर केली. पोवाडे, गाणी, नाटक, व्याख्यान तसेच अन्य सार्वजनिक कार्यक्रम करू नयेत, सांस्कृतिक कार्यक्रम ऑनलाईन आयोजित करावेत, रॅली-मिरवणुकीलाही परवानगी नाकारण्यात आली आहे.
शहर व ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणी असलेल्या मोठ्या शिवपुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी पोलीस प्रशासनाची परवानगी घ्यावी. यासाठी १००पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे.