भाजपाला 2016 मध्येच नीरव मोदीच्या घोटाळ्याची माहिती होती; शरद पवारांचा गौप्यस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 06:29 PM2018-02-17T18:29:44+5:302018-02-17T18:30:59+5:30

देशाला फसवून पळून गेलेली ही मंडळी भाजपला पाठिंबा देणारी

Sharad Pawar's remarks on Prime Minister Narendra Modi's manifesto, BJP's performance in Pandharpur | भाजपाला 2016 मध्येच नीरव मोदीच्या घोटाळ्याची माहिती होती; शरद पवारांचा गौप्यस्फोट

भाजपाला 2016 मध्येच नीरव मोदीच्या घोटाळ्याची माहिती होती; शरद पवारांचा गौप्यस्फोट

Next
ठळक मुद्देआगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीसह समविचारी पक्षांची आघाडी होणार : शरद पवार देशाला फसवून पळालेले सर्वजण भाजपा समर्थक : शरद पवारदेशाचे आर्थिक लुट करणारे सत्ताधारी भाजपाचे समर्थक : शरद पवार

सोलापूर : देशात सर्वात मोठी लूट करणाऱ्या नीरव मोदीच्या घोटाळ्याची लेखी तक्रार देशातील एका प्रतिष्ठित व्यक्तीने प्रधानमंत्री कार्यालयात केली होती. मात्र, जाणूनबुजून या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यावेळी योग्य ती खबरदारी घेण्यात आली नाही. एकप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच नीरव मोदीला वाचवले, असा आरोप माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

नीरव मोदी प्रकरणी मनमोहन सरकारवर आरोप केले जात असले तरी नीरव याने २०११ मध्ये फक्त बँक खाते उघडले होते आणि बाकीची फसवणूक मोदी सरकारच्या काळातीलच असल्याचा आरोप पवार यांनी केला. पंतप्रधान कार्यालयाला याबाबत २०१६ मध्ये कळवूनही त्याची दखल घेतली गेली नसल्याने नीरव मोदी देशाला फसवून पळून जाण्यात यशस्वी ठरला, असेही पवार म्हणाले. देशाला फसवून पळून गेलेली ही मंडळी भाजपला पाठिंबा देणारी आहे, असा टोलाही पवार यांनी लगावला. 

पंढरपूर तालुक्यातील वाडीकुरोली येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे होते. तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खा. विजयसिंह मोहिते-पाटील, खा. धनंजय महाडिक, आ. गणपतराव देशमुख, आ. बबनराव शिंदे, आ. भारत भालके, आ. हणमंतराव डोळस, आ. सिद्धाराम म्हेत्रे, आ. दत्तात्रय सावंत, माजी खा. रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आ़ दीपक साळुंखे, विनायकराव पाटील, दिलीप माने, जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष बळीराम साठे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश शामराव पाटील, तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, प्रांतिक सदस्य राजूबापू पाटील, बाळासाहेब शेळके, युवराज पाटील, मनपा विरोधी पक्षनेता चेतन नरोटे आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, पंजाब नॅशनल बँकेतील गैरव्यवहाराचा मुख्य सूत्रधार नीरव मोदी हा ११ हजार कोटी घेऊन गेला. तो गेल्यानंतर आता सरकार म्हणते की, त्याचा पासपोर्ट रद्द करू. २०१६ साली पंतप्रधान कार्यालयाला पत्राद्वारे आम्ही कळविले होते. त्यावेळी चौकशी करून कारवाई करू, असे आम्हाला सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. जर शेतकऱ्यांची बँकेची ४-५ हजारांची थकबाकी राहिली तर भांडी बाहेर काढली जातात. त्याच्या अब्रुचा पंचनामा केला जातो. हे कसले राज्यकर्ते?, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला.

डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात तांदळाच्या निर्यातीत भारत जगात एक नंबर होता. तसेच गहू आणि कापसाच्या निर्यातीत भारताचे स्थान दुसरे होते. सध्या अर्थव्यवस्था ढासळण्यामागे शेतमालाला योग्य भाव न मिळणे, हे प्रमुख कारण आहे. शेतकरी आता मंत्रालयात जाऊन आत्महत्या करू लागला आहे. ही परिस्थिती चिंताजनक असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

Web Title: Sharad Pawar's remarks on Prime Minister Narendra Modi's manifesto, BJP's performance in Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.