सात लाख महिलांची तपासणी करणार; स्तनाचा कर्करोग कायमचा हद्दपार करणार
By Appasaheb.patil | Updated: March 14, 2024 19:37 IST2024-03-14T19:36:52+5:302024-03-14T19:37:39+5:30
स्तनाचा कर्करोग जनजागृती मोहिम अंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कंदलगाव येथे या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

सात लाख महिलांची तपासणी करणार; स्तनाचा कर्करोग कायमचा हद्दपार करणार
सोलापूर: जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व निरामय हॉस्पिटल यांच्या संयुक्त प्रयत्नातून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्तनाचा कर्करोग जनजागृती राबवण्यात येणार आहे. सदरची मोहीम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांची संकल्पना व मार्गदर्शनातून करण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील २५ वर्षांवरील एकूण ७ लाख महिलांची तपासणी करण्याचे ध्येय ठेवण्यात आले असून या तपासणीनंतर जिल्ह्यातून स्तराचा कर्करोग कायमचा हद्दपार करण्याचा निश्चित आरोग्य विभागाने केला आहे.
दरम्यान, स्तनाचा कर्करोग जनजागृती मोहिम अंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कंदलगाव येथे या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. स्तनाचा कर्करोग जनजागृती मोहिमेअंतर्गत निरामय संस्थेच्या प्रगतशील ए आय तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. दरम्यान या मोहिमेअंतर्गत महिलांची थर्मल स्क्रीनिंग करणे, सोनोग्राफी व मॅमोग्राफ उपकरणे पुरवणे, जनजागृती करणे, उपचाराकरिता पाठपुरावा करणे, तज्ञांचा सल्ला घेणे, उपचारास जिल्हा परिषद निधी मधून २० हजार पर्यंत सहाय्य करणे या गोष्टींचा समावेश आहे. कर्करोग सारख्या आजारात लवकर निदान हाच सर्वात मोठा उपचार असतो म्हणूनच यासाठी स्वतंत्र ॲम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे, असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी व्यक्त केले.