सोलापुरात धावत्या हायवे पेट्रोलिंग व्हॅनसमोर उडी मारल्यानं 'तो' गंभीर जखमी
By विलास जळकोटकर | Updated: July 8, 2023 17:32 IST2023-07-08T17:30:56+5:302023-07-08T17:32:18+5:30
नॅशनल हायवेवर घात अपघातावर नियंत्रण ठेवणे व त्यांना सुरक्षितरित्या उपचारासाठी दाखल करण्यासाठी कायमस्वरुपी पेट्रोलिंग व्हॅन तैनात असते.

सोलापुरात धावत्या हायवे पेट्रोलिंग व्हॅनसमोर उडी मारल्यानं 'तो' गंभीर जखमी
सोलापूर : नॅशनल हायवेवर पेट्रोलिंग करणाऱ्या व्हॅनसमोर ५५ वर्षाच्या व्यक्तीनं अचानक उडी मारल्यानं तो गंभीर जखमी झाला. शनिवारी पहाटे चारच्या सुमारास शहरानजीकच्या रिलायन्स मार्केटसमोरील रोडवर ही घटना घडली. जखमीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
नॅशनल हायवेवर घात अपघातावर नियंत्रण ठेवणे व त्यांना सुरक्षितरित्या उपचारासाठी दाखल करण्यासाठी कायमस्वरुपी पेट्रोलिंग व्हॅन तैनात असते. शुक्रवारच्या रात्री एन एच १६० वर चारचाकी १०३३ पेट्रोलिंग व्हॅन मंगळवेढा- सोलापूर या मार्गावरुन धावत होती. शनिवारी पहाटे चारच्या सुमारास ही व्हॅन शहरानजीकच्या रिलायन्स मार्केटसमोरील रोडवर आलेली असताना अचानक ५५ वर्षीय व्यक्तीनं या वाहनासमोर उडी मारल्यानं त्याच्या तोंडास गंभीर दुखापत झाली. याच वाहनानं त्या व्यक्तीला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. तो शुद्धीवर आहे मात्र त्याला बोलता येत नसल्याचे सांगण्यात आले. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.