ऊसापासून इथेनॉलनिर्मिती बंदीला स्वाभिमानीचा विरोध; मंगळवेढ्यात अध्यादेशाची केली होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2023 14:28 IST2023-12-10T14:28:18+5:302023-12-10T14:28:36+5:30
केंद्र सरकारने गुरुवारी देशातील सर्व साखर उद्योगांनी उसापासून इथेनॉल निर्मिती बंद करावी, असा अध्यादेश काढला आहे.

ऊसापासून इथेनॉलनिर्मिती बंदीला स्वाभिमानीचा विरोध; मंगळवेढ्यात अध्यादेशाची केली होळी
-मल्लिकार्जुन देशमुखे
मंगळवेढा : मंगळवेढा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने केंद्र सरकारचा उसापासून इथेनॉलनिर्मिती बंदीच्या अध्यादेशाची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. आंदोलनाची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
केंद्र सरकारने गुरुवारी देशातील सर्व साखर उद्योगांनी उसापासून इथेनॉल निर्मिती बंद करावी, असा अध्यादेश काढला आहे. यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेले इथेनॉल प्रकल्प अडचणीत येणार तर आहेतच, तसेच या निर्णयामुळे इथेनॉलनिर्मितीतून मिळणारे अधिकचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार नाही. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे. याचा परिणाम उसाच्या अंतिम दरावर होणार आहे.
याशिवाय उपपदार्थाच्या निर्मितीमधून मिळणाऱ्या अधिकचे उत्पन्न घटणार असल्याने साखरकारखानदारांबरोबरच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक युवराज घुले यांनी केला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्तात्रय भोसले, अर्जुन मुद्गुल, सिद्धेश्वर जाधव, बाळासाहेब नागणे, बापू कलुबरमे, रवी गोवे ,काका दत्तू आदी शेकडो शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.