Santosh Deshmukh Murder Case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बुधवारी पंढरपूरमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये दिवंगत संतोष देशमुख यांचे कुटुंब देखील सामील झाले होते. यावेळी दिवंगत देशमुख यांच्या मुलीने न्यायाची मागणी करत पंढरपूरच्या विठुरायाकडे साकडं घातलं आहे. "माझ्या वडिलांनी गावचे कुटुंब प्रमुख म्हणून काम केलं आहे. एका दलित बांधवाला वाचवण्यासाठी ते गेले होते. अशा माझ्या वडिलांवर आज जातीयवादाचा आरोप केला जात आहे. आरोपीला कठोरात कठोर शासन करण्याची बुद्धी सरकारला मिळावी," असे साकडे वैभवी देशमुखने विठ्ठलाला घातले.
आक्रोश मोर्चामध्ये माढ्याचे आमदार अभिजीत पाटील, मराठा समाजाचे नेते नागेश भोसले, प्रणव परिचारक, प्रशांत गिड्डे, किरण घाडगे आदी उपस्थित होते. यावेळी संजीव भोर म्हणाले की, "विशेष सरकारी वकिलांची नेमणूक न झाल्याने तपासामध्ये ज्या काही उणिवा, त्रुटी राहतील त्याचा फायदा आरोपींना मिळू शकतो. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला देशमुख कुटुंबाचा जर आक्षेप असेल तर त्यांच्याशी इतर नावांवर चर्चा करून तत्काळ सरकारी वकिलाची नेमणूक करावी. हत्येची घटना घडल्यापासून प्रत्येक बाबतीत सरकार दिरंगाई करत आहे. या प्रकरणात अनेक पोलिस अधिकारी आरोपींबरोबर फिरताना दिसत असताना देखील त्यांच्यावर कारवाई होत नाही. प्रशांत महाजन आणि राजेश पाटील या पोलिसांना सहआरोपी करावे. वाल्मीक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई केली. मात्र त्याच्यावर खुनाचा कट रचणे, खून करणे असे गुन्हे दाखल केले नाहीत," असा गंभीर आरोपदेखील यावेळी संजीव भोर यांनी केला.
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुंडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार नसतील तर आता मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
धनंजय देशमुख काय म्हणाले?
"संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकिलाची लवकरात लवकर नेमणूक करावी. आरोपीला फाशीवर लटकवण्यासाठी कुठलीही अडचण येत कामा नये. मुख्यमंत्र्यांनी सर्व आरोपींना फासावर लटकवू असा शब्द दिला आहे. या शब्दावर आम्ही अपेक्षा ठेवून आहोत. यासाठी तात्काळ विशेष सरकारी वकिलाची नेमणूक गरजेचे आहे," अशा भावना मृत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी व्यक्त केल्या आहेत.