संजयमामा-देशमुखांचा बहरतोय दोस्ताना; काँग्रेसच्या गोटात वाढतेय अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 12:46 PM2020-12-26T12:46:52+5:302020-12-26T12:46:58+5:30

शहराचे राजकारण : महाआघाडीत नेतृत्वाचा मुद्दा, ‘एमआयएम’मध्ये केवळ व्यवहारांची चर्चा

Sanjay Mama-Deshmukh's growing friendship; Growing unrest in the Congress faction | संजयमामा-देशमुखांचा बहरतोय दोस्ताना; काँग्रेसच्या गोटात वाढतेय अस्वस्थता

संजयमामा-देशमुखांचा बहरतोय दोस्ताना; काँग्रेसच्या गोटात वाढतेय अस्वस्थता

Next

सोलापूर : महापालिकेतील विषय समित्यांच्या निवडीत भाजप वरचढ ठरला. शिवसेनेच्या पदरी निराशा आली. भाजपविरुध्द इतर पक्षांची मोट बांधली जाऊ शकते. याचा ट्रेलर आमदार संजय शिंदे यांनी दाखवला. परंतु त्यानंतर गड्डा यात्रेच्या निमित्ताने शिंदे आणि आमदार विजयकुमार देशमुख यांचा दोस्ताना आणखी वाढताना दिसतोय. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता आहे.

महापालिकेत सात विषय समित्यांच्या निवडी मंगळवारी झाल्या. भाजपविरुध्द शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी, एमआयएमचे नेते एकत्र आले. भाजप नगरसेवकांना एकसंघ ठेवण्याचे काम आमदार विजयकुमार देशमुख यांनी तर महाआघाडीच्या नेत्यांना आमदार संजय शिंदे यांनी केले. काँग्रेस आणि शिवसेनेतून विरोधी पक्षनेता महेश कोठे यांना तीव्र विरोध झाला. याचा फटका महाआघाडीला बसला. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपविरुध्द महाआघाडी होईल, असे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते सांगत असले तरी महाआघाडीतील नेतृत्व कोण करणार, यावरून बिघाडी होऊ शकतो.

भाजपतही दिसतोय बदल

आमदार विजयकुमार देशमुखांना पालिकेच्या राजकारणाची नस सापडल्याचे दिसते. भाजपत गटबाजी असली तरी दोन्ही गटाचे बहुतांश नगरसेवक विचारांशी बांधील आहेत. या देशमुखांकडे गळ्ळी-बोळातील दादांपासून मान विविध जाती-धर्मातील लोकांत मिसळणाऱ्या नगरसेवकांची टीम दिसते. परवा काँग्रेसचे बडे नेते नेहमीप्रमाणे नगरसेवकांना विचारायला तयार नव्हते. पण देशमुखांचे लोक ''भाई-भाई'' करीत काँग्रेस, एमआयएम नगरसेवकांच्या घरात बैठका घेत होते. देशमुख सध्या पक्षातील विरोधकांचा ''कार्यक्रम'' लावत आहेत. भाजपच्या आजवरच्या डावपेचात ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील पुढे असायचे. कालच्या निवडीची बरीच सूत्रे माजी नगरसेवक अनंत जाधव व इतरांकडे दिसली.

बोमड्याल यांची खंत

शिवसेनेत महेश कोठे यांना विरोध आहेच. आता पूर्व भागातील पाठीराखे नाराज होत असल्याचे चित्र आहे. भाजपचे नगरसेवक अविनाश बोमड्याल यांचा मंड्या नि उद्यान समितीच्या निवडीत पराभव झाला. बोमड्याल हे कोठे परिवाराचे जावई. शहर मध्य विधानसभेच्या निवडणुकीत भाजप नेत्यांचा आदेश डावलून आमच्या कुटुंबाने महेश कोठे यांचा प्रचार केला. मंड्या नि उद्यान समितीमध्ये प्रथमेश कोठे आणि कोठे गटाच्या मंदाकिनी पवार यांचा समावेश आहे. आम्ही पक्ष आदेश डावलून आजवर कोठे यांचे काम केले. परंतु, कोठे परिवार आमच्या मदतीला आला नाही, असे बोमड्याल यांनी पत्रकारांना बोलून दाखवले.

‘एमआयएम’ध्ये चिरमिरीचा खेळ

पालिकेत ‘एमआयएम’चा दबदबा वाढतोय. पण काही नगरसेवक आणि नगरसेविका चिरमिरीसाठी विचारांना हरताळ फासत असल्याचे वारंवार दिसते. या चिरमिरीची गावभर चर्चा होते. कालच्या निवडीत भाजपला मतदान करण्यासाठी एका नगरसेविकेच्या पतीने पैसे घेतल्याची चर्चा आहे. भाजपपेक्षा तुम्ही जास्त पैसे द्या, आम्ही तुम्हाला मतदान करू, अशी मागणी त्याने काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांकडे केली. या संभाषणाचे रेकॉर्डिंग पत्रकारांना ऐकवले जात आहे.

नवी समीकरणे येऊ शकतात

महाआघाडीच्या नेत्यांना आमदार संजय शिंदे एकत्र आणू शकतात, असे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटते. मोहिते-पाटील वगळता इतरांच्या मतदारसंघात जास्त हस्तपेक्ष न करणे, विरोधी पक्षातील लोकांशी चांगले संबंध ठेवणे हा संजयमामांचा पिंड आहे. काँग्रेस अस्वस्थ असली तरी भाजपचा दोस्ताना कायम आहे. त्यातून नवी समीकरणे उदयाला येऊ शकतात.

Web Title: Sanjay Mama-Deshmukh's growing friendship; Growing unrest in the Congress faction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.