सांगली, जतमधून आला सोलापुरात गवा; 'रेस्क्यू'साठी पाच जणांचे पथक दाखल
By Appasaheb.patil | Updated: January 31, 2023 16:46 IST2023-01-31T16:46:08+5:302023-01-31T16:46:32+5:30
शहराकडे दाट लोकवस्ती असल्याने गवा इकडे येणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. यासाठी पुण्याहून 'रेस्क्यू'चे पाच जणांचे पथक आले आहे.

सांगली, जतमधून आला सोलापुरात गवा; 'रेस्क्यू'साठी पाच जणांचे पथक दाखल
सोलापूर : देगाव परिसरातील देशमुख-पाटील वस्ती परिसरात आढळलेला गवा आता बेलाटी परिसरात गेला आहे. त्याला त्याच्या मूळ ठिकाणी जाण्यासाठी रस्ता तयार करून देण्यात येणार आहे. तरीही त्याने शहराकडे येण्याचा प्रयत्न केल्यास त्याला बेशुद्ध करण्यात येणार आहे. शहराकडे दाट लोकवस्ती असल्याने गवा इकडे येणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. यासाठी पुण्याहून 'रेस्क्यू'चे पाच जणांचे पथक आले आहे.
दरम्यान, गरज पडल्यास गव्याला बेशुद्ध करण्यासाठी ट्रँक्युलायजर गनची (बेशुद्ध करण्याची बंदूक) व्यवस्था करण्यात आली आहे. गव्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचे पथकही सज्ज आहे. यासोबतच सोलापूर वन विभागाचे १५ तर पुण्यातील रेस्क्यू टीमचे ५ जण गव्याच्या हालचालींकडे लक्ष देत आहेत. गवा सांगली-जत या भागातून आला असण्याची शक्यता आहे. त्याच भागाकडे तो पुन्हा जावा, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. शहराकडे गवा येत असल्यास आवाज करणे, फटाके फोडणे आदी प्रयत्न करण्यात येत आहेत.
या गावातील नागरिकांनी घ्यावी काळजी
बेलाटी, डोणगाव, कवठे गावाच्या परिसरात गव्याच्या पायाचे ठसे दिसले आहेत. या भागात गवा असू शकतो. गवा लाजाळू असल्याने स्वत:हून हल्ला करत नाही. मात्र, गोंधळ झाल्यास तो बिथरू शकतो. त्यामुळे या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे, गवा दिसल्यास त्याला रस्ता मोकळा करून द्यावा, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.
गवा तसा शांत व लाजाळू प्राणी आहे. त्याच्या मागे लोक लागल्यास तो बिथरू शकतो. त्यामुळे नागरिकांनी गवा दिसल्यास त्याचा पाठलाग न करता त्याला जाण्यासाठी रस्ता करून द्यावा. हा गवा सांगली-जत भागातून आला असावा, म्हणून तो पुन्हा तिकडे जावा, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
- धैर्यशील पाटील, उपवन संरक्षक, वन विभाग, सोलापूर.