एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले; घरभाडे, मुलांचे शिक्षणही थांबले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 16:03 IST2021-08-17T16:03:02+5:302021-08-17T16:03:07+5:30
कारण कोरोनाचेच : परिस्थिती सुधारली तरी कर्मचारी दुर्लक्षितच

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले; घरभाडे, मुलांचे शिक्षणही थांबले !
सोलापूर : जगभर कोरोनाचे संकट असताना केवळ एस.टी. खात्यातच कोरोना शिरला का, असा सवाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहेत. त्यामुळे घरभाडे अन् मुलाबाळांचे शिक्षणही थांबल्याचा सूर त्यांच्यामधून ऐकावयास मिळत आहे.
देशात रविवारी स्वातंत्र्य दिन हा उत्साहात साजरा झाला. पण, हा राष्ट्रीय सणही एसटी कर्मचाऱ्यांना विनावेतन साजरे करावे लागले. एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला होणे गरजेचे आहे. पण, यंदाचे वेतन १५ तारीख येऊनही न झाल्यामुळे कोरोना जगभर आला आहे का फक्त एसटीमध्ये आला आहे, असा प्रश्न कर्मचारी उपस्थित करत आहेत.
कोरोनाचा फटका बसला आहे, असे सांगत एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन दिले जात नाही. एसटी कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक कर्मचारी म्हणून गणले जाते. पण वेतन देताना मात्र त्यांच्याकडे पाहिले जात नाही. वेळेवर वेतन होत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे घराचे भाडे तर तटलेच आहे, सोबत मुलांच्या शैक्षणिक साहित्याची खरेदीही थांबलेली आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणावर याचा मोठा परिणाम हाेत आहे. म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांना तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत एसटी अधिकाऱ्यांना संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.
उत्पन्न एवढेच खर्च, वेतनासाठी पैसे देणार कोण?
सोलापूर विभागाचे एका दिवसाचे उत्पन्न जवळपास ३५ लाख आहे. यात डिझेलचा खर्च जवळपास ३२ लाख रुपयांचा होतो आणि ३ लाख रुपये टोलसाठी जातात. म्हणजेच जेवढे उत्पन्न, तेवढा खर्च विभागला आहे. सोलापूर विभागांची स्थिती तशी चांगली म्हणावी लागेल, पण इतर विभागांची परिस्थिती यापेक्षा वाईट आहे, असे जाणकारांचे मत आहे.
एसटीचे वेतन सात तारखेला होणे गरजेचे असते. पण, आज १५ तारीख होऊनही कर्मचाऱ्यांचे वेतन झाले नाही. एसटी कर्मचाऱ्यांनी स्वातंत्र्य दिनासारखा राष्ट्रीय सणही आम्ही विनावेतन साजरा केला. वेळेवर वेतन देण्याची जबाबदारीही विभाग नियंत्रक यांची असते. पण, त्यांनी ही जबाबदारी वेळेवर पार पाडणे गरजेचे आहे.
- राजाभाऊ सोनकांबळे, विभागीय अध्यक्ष, कास्ट्राईब राज्य परिवहन