रुक्मिणी जत्रेचे आकर्षण; मळोलीच्या बैलगाडीला मुंबईतून मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 14:22 IST2020-02-21T14:20:52+5:302020-02-21T14:22:52+5:30
सोलापूर जिल्हा; बलवडीच्या हातमागावरील घोंगडी ठरताहेत लक्षवेधक

रुक्मिणी जत्रेचे आकर्षण; मळोलीच्या बैलगाडीला मुंबईतून मागणी
सोलापूर : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातर्फे आयोजित रुक्मिणी जत्रेत मुंबईत मार्केट मारलेली मळोलीची बैलगाडी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
रुक्मिणी जत्रेत सोलापूरसह पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील बचत गटाने तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात पापड, मिरची मसाले, शेव, लाडू, चिवड्याच्या विविध प्रकारांबरोबर लोकर वापरून तयार केलेली खेळणी, पडदे, वॉल हँगर लक्ष वेधून घेत आहेत. बार्शी तालुक्यातील शिवतेज महिला बचत गटाच्या सावित्रा राठोड यांनी बंजारा आर्टचे कपडे सादर केले आहेत. ओढणी व लमाणवर्कच्या ड्रेसची किंमत पाच हजारांपर्यंत आहे. सांगोला तालुक्यातील बलवडीच्या महालक्ष्मी बचत गटाच्या सिंधू पवार यांनी हातमागावर तयार केलेली घोंगडी आणली आहेत.
७०० पासून १२०० रुपयांपर्यंतची विविध आकारातील ही घोंगडी आहेत. चादरी व रगच्या जमान्यात ग्रामीण भागात धार्मिक विधीसाठी घोंगडीला मागणी आहे. त्याचबरोबर योगासन, मणक्याचे आजार, पाठदुखीसाठी लोकरीचे जीन वापरले जाते. हातमागावर तयार केलेल्या लोकरीच्या या वस्तूंना आजही चांगली मागणी असल्याचे पवार यांनी सांगितले. त्याचबरोबर जवळा येथील कोहिनूर बचत गटाच्या बिस्मिल्ला नदाफ यांनी लोकरीपासून बनविलेले जीन, गोधडी, वूलन कॅप प्रदर्शनात सहभागी केल्या आहेत.
सांगोला तालुक्यातील मळोली येथील सिद्धिविनायक बचत गटाच्या जयश्री मोटे यांनी लाकडी वस्तू सादर केल्या आहेत. यात खेळण्यातील सागवानी बैलगाडीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. गेल्या आठ वर्षांपासून मोटे यांनी लाकडी वस्तू बनविण्याचे काम सुरू केले आहे. लग्नातील रुखवत व बंगल्यातील दर्शनी भागात ठेवण्यासाठी या खेळण्यांना मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. लाकडी बैलगाडी अडीच ते तीन हजाराला आहे.
गेल्या वर्षी मुंबईत खारघर येथे झालेल्या प्रदर्शनात साडेचार हजार भाव मिळाल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत त्यांनी पाच हजार बैलगाड्या तयार करून विकल्या आहेत. मोटे कुटुंबांचा पारंपरिक सुतारकाम हा व्यवसाय आहे. पण लाकडी खेळणीला चांगली मागणी असल्याचे लक्षात आल्यावर बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी हा व्यवसाय मोठा केला आहे. जुने साग विकत घेऊन बैलगाडी, पाट, चौरंग, पोळपाट, बेलणे, रवी या साहित्याबरोबर बैलगाडी, कार, ट्रक, तबला, बैल, देवतांची मूर्ती, करंडा, उतरंडी अशा वस्तू बनविल्या जातात. एक बैलगाडी बनविण्यास एक दिवस लागत असल्याचे मोटे यांनी सांगितले.
मातीची भांडी
- कोल्हापूर जिल्ह्यातील वडगणे (ता. करवीर) येथील यशस्वी महिला बचत गटाने लाल मातीची भांडी प्रदर्शनात ठेवली आहेत. गॅस व चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी लागणारी भांडी वेगवेगळ्या पद्धतीने बनविण्यात आली आहेत. दही भांडे, शो-पीस लक्ष वेधत आहेत. मातीची भांडी वापरल्याने आरोग्याला होणारे फायदे यावेळी पटवून देण्यात येत आहेत.