नातेपुतेत मध्यरात्रीत सराफाचे दुकान फोडले, सीसीटीव्ही डिवाइसह १४ लाखांचे दागिने लंपास
By काशिनाथ वाघमारे | Updated: December 25, 2023 21:48 IST2023-12-25T21:47:46+5:302023-12-25T21:48:00+5:30
भुस्सा पोती रिकामी करुन दागिने पळवले, नकली दागिन्यांना हातही लावला नाही

नातेपुतेत मध्यरात्रीत सराफाचे दुकान फोडले, सीसीटीव्ही डिवाइसह १४ लाखांचे दागिने लंपास
सोलापूर: नातेपुतेच्या बाजारपेठेतील एका सराफाचे दुकान सोमवारी मध्यरात्री फोडून चोरट्यांनी भुश्शांची पोती रिकामी करुन त्यात १४ लाख २० हजारांचे सोने आणि चांदीचे दागिने पळवून नेले. इतकेच नव्हे तर दुकानातील सीसी टीव्हीच्या डीव्हाईसह हे दागिने पळविल्याने पोलिसांपुढे तपासाचे आव्हान उभे राहिले आहे.
याबाबत राजेश चंद्रशेखर चंकेश्वरा यांनी पोलिसात धाव घेतली. सोमवार, २५ डिसेंबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी श्वान पथक आणि फिंगरप्रिंट पथकाला पाचारण केले होते. पोलिस सूत्राकडील माहितीनुसार नातेपुते -वालचंदनगर रोडवर मुख्य बाजारपेठेत राजेश चंकेश्वरा यांचे खाली दुकान आणि वरच्या मजल्यावर घर आहे. रविवारी रात्री जेवण उरकून वरच्या मजल्यावर झाेपी गेले. सोमवारी मध्यरात्री उत्तर दिशेचे शटर उचकटून प्रवेश केला. दुकानातील मुख्य दरवाजाची चावी त्यांना मिळाली. दुकानाच्या मागील बाजूस भुशाचे पोते रिकामे करून या पोत्यात पैंजण आणि जोडवी नेल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते आहे.सकाळी सात वाजेदरम्यान दुकान मालकास चोरी निदर्शनास आली. चोरट्यांनी दुकानातील सर्व सी सी कॅमे-यांच्या वायरी तोडून डिवाइस पळविल्याचे निदर्शनास आले.
घटना समजताच नातेपुते पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सपांगे, फौजदार विक्रांत ढिगे घटनास्थळी दाखल झाले. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व त्यांच्या सहका-यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. त्यानंतर सोलापुरातून श्वान पकथक आणि फिंगरप्रिंटला पाचारण करण्यात आले हाेते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
--
नकली दागिन्यांना हातही लावला नाही
दुकानातून १५ ते १६ किलो चांदीचे दागिने लांबविले. पैंजण, जोडव्यांचा पळवलेल्या दागिन्यात समावेश आहे. तसेच ३०० ते ३५० ग्रॅम सोने चोरट्यांनी लंपास केले आहे. हे करीत असताना नकली सोन्याच्या दागिन्यांना चोरट्यांनी स्पर्शही केला नाही.
----
घटनास्थळी आमदारही ..
घटनास्थळी आमदार राम सातपुते यांनी भेट देऊन संबंधीत सराफाशी चर्चा करुन पोलिस अधिका-यांना चोरीचा तपास तातडीने लावण्यास सांगितले.