रखडलेल्या तीनही राष्ट्रीय महामार्गातील अडथळे दूर

By Admin | Updated: August 17, 2014 23:39 IST2014-08-17T23:39:37+5:302014-08-17T23:39:37+5:30

केंद्रीय वन्यजीव बोर्डाकडून ग्रीन सिग्नल: विजापूर, तुळजापूर, हैदराबादकडे जाणारे महामार्ग होणार चारपदरी

Removed obstacles in three national highways | रखडलेल्या तीनही राष्ट्रीय महामार्गातील अडथळे दूर

रखडलेल्या तीनही राष्ट्रीय महामार्गातील अडथळे दूर

सोलापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे सोलापूरला अक्कलकोट-गुलबर्गा तसेच संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज या पालखी मार्गांच्या चौपदरीकरणाची भेट मिळाली आहे़ या दौऱ्यामुळेच बऱ्याच वर्षांपासून रखडलेल्या सोलापूर- विजापूर, सोलापूर- हैदराबाद तसेच सोलापूर- येडशी (तुळजापूर रोड) या महामार्गाच्या कामाला गती मिळणार आहे़ १२ आॅगस्ट रोजी केंद्रीय वन्यजीव बोर्डाने (नॅशनल वाईल्ड लाईफ बोर्ड) या तीनही महामार्गांना पर्यावरण विषयक मंजुरी दिली आहे़ त्यामुळे येत्या तीन वर्षांत सोलापुरातील पाचही प्रमुख मार्ग चौपदरीकरणाच्या माध्यमातून जोडले जातील असे दिसते़
सोलापूर ते पुणे हा महामार्ग आय.एल. अ‍ॅण्ड एफ.एस. या आंतरराष्ट्रीय कंपनीने पूर्ण केला़ त्याचे पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटनही झाले़ हे भव्यदिव्य काम पाहूनच शहराच्या प्रगतीबद्दल अनेकांनी सकारात्मक चर्चा सुरू केली़ सोलापूर ते विजापूर या कामाचे चौपदरीकरण देखील मंजूर होऊन तीन वर्षांचा कालावधी लोटला मात्र कोंडी ते हत्तूर हा बायपास माळढोक परिक्षेत्रातून जात असल्यामुळे तो रखडला होता़ सद्गुरु इंजिनिअरिंग या कंपनीने हे सुमारे ९०० कोटींचे कामही घेतले होते मात्र वेळेत पर्यावरण विषय राज्य आणि केंद्र शासनाने मंजुरी न दिल्यामुळे त्या कंपनीने आपला ठेका रद्द केला होता़ त्यामुळे पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया करण्यात आली आहे़ आता पर्यावरणविषयक मंजुरी मिळाल्यामुळे बायपाससह विजापूररोडचे चौपदरीकरण होण्यातील अडथळा दूर झाला आहे़ लवकरच या कामाचा ठेका निश्चित केला जाणार आहे़
सोलापूर ते येडशी मार्गावर देखील रामलिंगजवळ वनखात्याच्या जागेतून ६ किलोमीटर रस्ता जातो तोही मंजुरीविना रखडला होता़ सोलापूर ते संगारेड्डी या ९२३ कोटींच्या कामाचा ठेका कोस्टल श्रेयी कंपनीला मिळाला असून, हा रस्ता देखील १० किलोमीटर वनखात्याच्या हद्दीतून जातो त्यामुळे या तीनही मार्गावरील वनखात्याने रस्ता करण्यास पंतप्रधान येण्यापूर्वी अवघे चार दिवस अगोदर मंजुरी दिली आहे़ केंद्रीय रस्ते, महामार्ग मंत्री नितीन गडकरी सोलापूर-अक्कलकोट- गाणगापूर- गुलबर्गा या मार्गाचे आणि पालखी मार्गाचे चौपदरीकरण व काँक्रिटीकरण करण्याची घोषणा केल्यामुळे दळणवळणासाठी अच्छे दिन येतील असे चित्र निर्माण झाले आहे़
कोंडी ते हत्तूर हा बायपास विजापूर रोडच्या चौपदरीकरणाच्या कामात समाविष्ट आहे मात्र बोरामणी ते हत्तूर हा बायपास झाला तरच तुळजापूर आणि हैदराबादहून येणारी आणि विजापूरकडे जाणाऱ्या जड वाहनांना चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकतो यासाठी या बायपासकडे देखील लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे़
---------------------------------
नॅशनल लाईफ बोर्डाची मंजुरी
सोलापूर-विजापूर महामार्गातील कोंडीपासूनचा २२ किमीचा बायपास रोड, सोलापूर-हैदराबाद मार्गावरील १० किमीचा रोड तसेच सोलापूर-येडशी मार्गावरील ६ किमीचा रोड हा वन्यजीव परिक्षेत्रातून जात आहे़ त्याला केंद्राची मंजुरी मिळणे गरजेचे होते़ आता या तीनही ठिकाणचे पर्यावरण विषयक मंजूऱ्या मिळाल्या आहेत़ माळढोक परिक्षेत्रामुळे तसेच वनखात्यामुळे या तीन महामार्गाचे काम पुढे सरकत नव्हते़ नॅशनल वाईल्ड लाईफ बोर्डाने याला मंजुरी दिल्यामुळे ही तीनही कामे लवकरच सुरू होतील़
- बी़बी़ इखे, प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

Web Title: Removed obstacles in three national highways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.