धार्मिक वादातून होईल तिसरे महायुद्ध
By Admin | Updated: August 23, 2014 00:57 IST2014-08-23T00:57:03+5:302014-08-23T00:57:03+5:30
मुजफ्फर हुसेन : पॅलेस्टाईन-इस्रायल जगातील सर्वात मोठा प्रश्न

धार्मिक वादातून होईल तिसरे महायुद्ध
सोलापूर : जागतिक पातळीवर पॅलेस्टाईन आणि इस्रायल या देशातील संघर्ष ही जगातील सर्वात मोठी डोकेदुखी होऊन बसली आहे. दोन्ही देशांतील अनेक वर्षांपासून चालत आलेला धार्मिक वाद हा न संपणारा विषय असून भविष्यात जर तिसरे महायुद्ध झाले तर ते धर्मावर आधारित होईल, असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री मुजफ्फर हुसेन यांनी व्यक्त केले.
विवेक विचार केंद्राच्या कार्यक्रमानिमित्त मुजफ्फर हुसेन हे शुक्रवारी सोलापुरात आले होते. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते पत्रकारांशी बोलत होते.
मुजफ्फर हुसेन म्हणाले की, मध्य पूर्व व मध्य आशियाईमध्ये सध्या मोठा गोंधळ सुरू आहे. सीरिया, इराण, इराक येथील युद्धनीतीवर दररोज बातम्या येत आहेत. क्रूड तेल डोळ्यांसामोर ठेवून अमेरिका राजकारण करीत आहे. यहुदीनंतर उदयाला आलेल्या ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मातील लोकांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. कधीही न संपणारा हा वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. इस्रायलमध्ये निर्माण झालेला मुस्लीमबहुल पॅलेस्टाईन देश यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. येणाऱ्या काळात भविष्यामध्ये तिसऱ्या महायुद्धाला कोठून सुरुवात होईल, हे सांगता येत नाही. मात्र हे महायुद्ध फक्त धर्मावर आधारित असेल आणि चौथ्या महायुद्धात फक्त दगडांचा वापर होईल, असे भाकीत मुजफ्फर हुसेन यांनी केले.
बहुतांश राष्ट्रांमध्ये मातृभाषेला सर्वात जास्त महत्त्व दिले जाते. परस्परांतील संबंधात सुधार व्हावा म्हणून आजूबाजूच्या देशातील भाषा अवगत केली जाते.
मात्र भारतामध्ये कॅनडा, इंग्लंड, अमेरिका आदी देशांतील भाषेकडे जास्त आकर्षण असल्याचे दिसून येते. वास्तविक पाहता शेजारी असलेल्या इस्लाम देशाची उर्दू, अरबी भाषादेखील अवगत करण्यावर भर दिला पाहिजे.
-------------------------------
भारताला पर्याय नाही....
इराकच्या क्रूड तेलावर देशातील सर्व दळणवळणाची भिस्त अवलंबून आहे. हे क्रूड तेल जर बंद झाले तर देशातील ९0 टक्के तेलपुरवठा बंद होईल. भारत हा अनेक नैसर्गिक साधनसंपत्तीयुक्त आहे. मोठ्या प्रमाणात समुद्र परिसर लाभला आहे. मात्र एकाही शास्त्रज्ञाला आणि संशोधकाला क्रूड तेल किंवा ऊर्जास्रोताचा शोध लावता आला नाही, ही मोठी शोकांतिका आहे. भारताला क्रूड तेलासाठी इराकनंतर पर्याय नाही, अशी चिंता यावेळी ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक मुजफ्फर हुसेन यांनी व्यक्त केली.